दारुच्या नशेत दगड घालून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येरवडा भागात एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना पहाटे घडली. दारुच्या नशेत हा प्रकार घडला असुन पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार संगमवाडी बॉम्बे सॅपर्स येथील (डब्ल्यूटी) वेपन ट्रेनिंग सेंटरच्या आवारातील मोकळ्या जागेत पहाटे ३ ते ५ यावेळेत घडला आहे. नरेश कुमार गर्ग (वय ३५) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुर्गेश गोपीनाथ गोस्वामी (वय २९, रा. लोहगाव) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, नरेशकुमार गर्ग आणि दुर्गेश गोस्वामी हे दोघेही सुतारकामाचा व्यवसाय करतात. त्यातून त्यांची ओळख झाली होती. एका सुतारकामाचे गोस्वामीचे २ हजार रुपये गर्ग याच्याकडे होते. पण तो पैसे देत नव्हता. रविवारी गोस्वामी याने त्याच्याकडे पुन्हा पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने गोस्वामी याला लोहगावहून बोलावून घेतले. रात्री ते दोघे दारु पिले. त्यावेळी गर्ग याने त्याला १ हजार रुपये दिले व अधिक पैसे नाहीत, असे सांगितले. त्यानंतर ते घरी जात असताना संगमवाडी येथे त्यांच्यात पुन्हा पैशाने वाद झाला. त्यातून दोघांत मारामारी झाली. त्यात गर्ग खाली पडला. तेव्हा गोस्वामी याने तेथील दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. त्यात गर्ग याचा मृत्यू झाला.

त्यानंतर गोस्वामी हा लोहगावला घरी परत आला. विश्रांतवाडी पोलिसांना संगमवाडी येथे एकाचा खून झाला असून आरोपी लोहगाव येथील असल्याची माहिती मिळाली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रफुल मोरे, प्रविण भालचिम, किशोर जोशी हे गोस्वामी याच्या घरी गेले. त्याच्याकडे गर्ग याचे पाकिट, मोबाईल मिळाले. त्याच्याकडे त्यांनी चौकशी केल्यावर त्याने आपण गर्ग याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी त्याला पकडून येरवडा पोलिसांच्या हवाली केले आहे. येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.