मदरशांचे अनुदान बंद करण्याची भाजपाची मागणी सुडबुद्धीची : नवाब मलिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मदरशांचे अनुदान बंद करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे. सुडबुद्धीतून आणि राजकीय द्वेष पसरवण्यासाठी भाजपची लोकं मदरशांचे अनुदान बंद करण्याची मागणी करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. वर्षभरापूर्वी आणि त्याआधी पाच वर्षे तुमची सत्ता असताना ही संकल्पना का सुचली नाही याचे उत्तर जनतेला अपेक्षित आहे असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी या संदर्भात ट्विट करत भाजपवर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मदरशांमधील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रतिमाह पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. ही योजना बऱ्याच काळापासून सुरु आहे. भाजपचे सरकार असताना ही योजना सुरुच होती आणि आता भाजपचे लोक अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत हे कितपत योग्य आहे, असा सवाल मलिक यांनी केला आहे.
भाजपाची मंडळी राजकीय दृष्टीकोन ठेवून ही मागणी करत आहेत. त्यांच्या काळात हज का बंद केले नाही याचं आत्मचिंतन करावं आणि मग अशा प्रकारची मागणी करावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे.