गँगस्टर एजाज लकडावालाच्या साथीदाराला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गँगस्टर एजाज लकडावाला याच्या जवळच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. नदीम लकडावाला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एका व्यापाऱ्याकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नदीम याला अटक करण्यात आली आहे. एजाज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या चौकशीदरम्यान नदीम याचे नाव समोर आल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नदीम लकडावाला याला शनिवारी मुंबई विमानतळावरून अटक केली. आज (रविवार) त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मागील आठवड्यात मोस्ट वॉंटेड गँगस्टर एजाज लकडावाला याला बेड्या ठोकल्या होत्या. बिहारची राजधानी पटणा येथून एजाजला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला मुंबईत आणून मुंबई पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. एजाज याच्याविरोधात मुंबई आणि दिल्लीत जवळपास 25 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये वसुली, खून आणि खंडणीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

गँगस्टर एजाज लकडावाला याच्या अटकेबाबत सह पोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितले होते की, त्याची मुलगी पोलिसांच्या ताब्यात होती. तिने चौकशीत सांगितले की, एजाज लकडावाला पटणा येथे येणार आहे. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बिहारमधील जट्टनपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एजाजला अटक केली. गँगस्टर एजाज लकडावाला याला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा निकटवर्तीय असल्याचे मानले जाते.