नागपूर मध्ये महापौरांच्या वाहनावर ‘गोळीबार’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरचे महापौर संदीप जोशी हे मध्यरात्री कुटुंबियासह घरी परतत असताना अज्ञाताने त्यांच्या वाहनावर गोळीबार केला. या गोळीबारातून महापौर थोडक्यात बचावले. ही घटना जामठा येथील नॅशनल कॅन्सर इस्टिट्युटजवळील रोडवर मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांनी घडली. मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी एकूण ४ गोळ्या झाडल्या. दहा दिवसांपूर्वी त्यांना एक निनावी धमकीचे पत्र आले होते.


याबाबतची माहिती अशी, महापौर संदीप जोशी यांच्या काल लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने वर्धा मार्गावरील जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटजवळच्या रसरंजन धाब्यावर ते आपले कुटुंबिय आणि मित्रांसह जेवायला गेले होते. धाब्यावरुन ते परत नागपूरला येत होते. अन्य मित्रांच्या गाड्या पुढे होत्या. सर्वात शेवटी संदीप जोशी हे फॉर्च्युनर गाडी घेऊन येत होते. नॅशनल कॅन्सर इस्टिट्युटजवळ त्यांच्या गाडीवर हल्लेखोरांनी बेछुट गोळीबार केला. हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या व ते पळून गेले.

जोशी यांनी प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. त्यांनी ही माहिती पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संदीप जोशी यांनी शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रमुख मार्ग व बाजार भागातील अतिक्रमण काढण्याचा मनोदय जाहीर केला आहे.

त्यादृष्टीने कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. याबरोबरच त्यांनी नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेण्यासाठी त्यांनी शहरातील विविध भागात १०० ठिकाणी तक्रार बॉक्स लावले आहेत. त्यात जोशी यांना एक निनावी धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रातील रोख अतिक्रमण कारवाईवर असल्याचे दिसून येत होते.

त्यात संदीप तुझे समझा रहे है, हिसाब से काम कर, बोहात गरम चल रहा है, अगर हमारी जिंदगी खराब हुई, और अगर हमारा कुछ भी नुकसान हुआ, तेरा क्या हाल होगा, तेरी जिंदगी बर्बाद करदुँगा, तेरा भी परिवार है, संभल जा, वरना ठोक देंगे तुझे और इस वॉर्निंग को हल्के में मत लेना, तेरा शुभचिंतक.
असे धमकीचे पत्र त्यांना मिळाले होते. याप्रकरणी ६ डिसेंबरला पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या गोळीबारामुळे महापौर यांच्या गाडीला गोळ्या लागल्या तेथील काचा तडकल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/