नायडू रुग्णालयामध्ये उभारणार नवीन ऑक्‍सिजन टॅंक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  पुणे महानगरपालिकेचे डॉ. नायडू हे संसर्गजन्य आजारांवरील उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये सर्व म्हणजे, दीडशे बेडवरील रुग्णांना आता पूर्णवेळ ऑक्‍सिजन ( Oxygen) उपलब्ध होणार आहे, तर व्हेंटिलेटरच्या रुग्णांनाही ऑक्‍सिजनची कमतरता भासणार नाही. यासाठी या रुग्णालयाच्या परिसरात 13 किलो लिटरचा (लिक्विड) ऑक्‍सिजन टॅंक ( Oxygen Tank) उभारण्यात येत आहे. यामध्ये सीरिअस रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत,तसेच मृत्युदर शून्य करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. शहरात येत्या डिसेंबर आणि जानेवारीत कोरोनाचा ( Corona) दुसरा टप्पा येण्याची भीती असून, या काळात अत्यवस्थ रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग आणि ऑक्‍सिजन बेड वाढविण्याची सूचना केंद्रीय पथकाने दिल्या आहेत. त्याची दखल घेत, महापालिकेने आता खबरदारी म्हणून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

सुरुवातीला कोरोनावर उपचार करण्यासाठी महापालिकेकडे हे एकच रुग्णालय होते. त्यामुळे कोरोनाच्या ( Corona) सुरुवातीच्या काळात मोठ्या अडचणी पार पाडाव्या लागल्या होत्या. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ऑक्‍सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाली. या काळात चाकण आणि अन्य ठिकाणांहून ऑक्‍सिजन मागविण्यात आले. तरीही पुरेसा पुरवठा झाला नव्हता. सध्या या रुग्णालयात जम्बो सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात येतो. परंतु “व्हेंटिलेटर वरील रुग्णांना अधिक ऑक्‍सिजनची गरज असल्याने चार तासांत सिलिंडर संपत होते. ते पुन्हा पुन्हा भरावे लागत असल्याने रुग्ण व अधिकारी-कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे खास ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल ( Rubal Agrwal) यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, पुण्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी केंद्रीय पथकाच्या सूचनांनुसार उपचार व्यवस्था तयार ठेवत आहोत. या पुढच्या काळात प्रत्येक गरजू रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार मिळतील, यालाच प्राधान्य आहे. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची गरज भासत होती. ती भागवताना आरोग्य खात्यापुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता त्यांचा विचार करून डॉ. नायडूत स्वतंत्र ऑक्‍सिजन टॅंक उभा करीत असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.