‘कोरोना’मुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आता कोरोना (Covid-19) रुग्णांच्या मृतांच्या आकडेवारीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणात राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा उल्लेख केला नाही. ना शेतकऱ्यांचा उल्लेख, ना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल उल्लेख. कोरोनावर तर ते बोललेचे नाहीत. कोरोनामुळं सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू हा महाराष्ट्रात झाला असंही त्यांनी सांगितलं. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का ? असा सवालही त्यांनी केला आहे.

नारायण राणे म्हणाले, “नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) आशीर्वादानं शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. मोदींच्या नावानं मत मागितली म्हणून 56 आमदार निवडून आले. त्यांचं नाव घेतलं नसतं तर सेनेचे 25 आमदार देखील निवडून आले नसते. हिंदुत्वाला मुठमाती देऊन ठाकरेंनी मंत्रिपद मिळवलं” अशी टीका राणे यांनी केली आहे.

दसऱ्याच्या निमित्तानं 47 शिवसैनिकांमध्ये झालेल्या भव्य सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं त्याला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद घेतोय असंही राणेंनी सांगितलं.

राणे म्हणाले, “मी आतापर्यंत पाहिलेले जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणानं, शैलीनं, विचारानं आणि कामानं आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. मात्र आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता. शिवराळ भाषेत ते बरळले आहेत” अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.