लग्नाच्या बेडीत अडकू पाहणारा मजनू अडकला पोलिसांच्या बेडीत

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाची स्वप्न पाहत लग्नाच्या बेडीत अडकू पाहणारा एक प्रेमवीर पोलिसांच्या बेडीत अडकल्याची घटना समोर आली आहे. चक्क महाविद्यालयात जाऊन प्राध्यापिकेला लग्नाची मागणी घातली आणि कुंकू लावल्याचं कृत्य एका मजनूनं केलं आहे. नाशिकमधील ही घटना आहे. एकतर्फी प्रेमातून एखादा प्रेमवीर किंवा प्रेयसी काय करतील, याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. एका मजनूने एकतर्फी प्रेमातून शहरभर प्रेसंदेश लिहिले होते. त्याची त्याला चांगलीच शिक्षा मिळाली होती. शिवाय हा तरूण व्यवसायाने सीए होता. यानंतर असाच हा प्रकार समोर आला आहे.

योगेश जावळे असं या मजनूचं नाव आहे. नाशकातील केटीएचएम महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या युवतीवर योगेशचं एकतर्फी प्रेम होतं. यातूनच हा प्रकार समोर आला आहे. याेगेशने कॉलेजमध्ये जात संबंधित प्राध्यापिकेची केबिन गाठली. ‘मला नोकरी लागली आहे, माझ्याशी लग्न कर’ असं म्हणत त्याने तिला लग्नाची मागणी घातली आणि कुंकू लावण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांना वेळीच ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी योगेशला मज्जाव केला. तेव्हा त्याने कॉलेजमधील इतरांनाही दादागिरी करत धक्काबुक्की केल्याचे समजत आहे.

या प्रकरणी योगेशविरोधात नाशकातील सरकारवाडा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि प्राध्यापिकांच्या सुरक्षेचं काय असा सवालही उपस्थित केला जात आहे. या गोष्टींना वेळीच आळा घातला नाही तर कदाचित हे प्रकार विद्यार्थिनी आणि प्राध्यापिकांच्या जीवावर बेतू शकतील असेही म्हटले जात आहे.