देशभरात ‘या’ महिन्यापासून उघडल्या जावू शकतात शाळा, ‘कोरोना’च्या संक्रमणामुळं मार्चपासून आहेत बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संक्रमणामुळे मार्चपासून बंद असलेल्या शाळा सप्टेंबरपासून उघडल्या जाऊ शकतात. सध्या जी प्रस्तावित योजना आहे, त्यामध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम बोलावण्यात येईल. ज्यांना रोटेशननुसार आठवड्यात दोन ते तीन दिवसच शाळेत यावे लागेल. जसजशी संसर्गाची स्थिती सामान्य होईल, तसतसा अन्य इयत्तांच्या विद्यार्थ्यांना बोलावण्याचा निर्णय घेण्यात येईल. शाळा उघडण्याची ही घोषणा 15 ऑगस्टनंतर होऊ शकते.

खासगी शाळांचा दबाव
ज्यापद्धतीने सार्वजनिक बससेवा, बाजार, मंदिरे नागरिकांसाठी उघडण्यात आली आहेत त्याचप्रमाणे शाळा उघडण्यासाठी दबाव वाढत आहे. यासाठी खासगी शाळांकडून आणि शिक्षण संस्था चालकांकडून दबाव जास्त वाढत आहे. मुलांचे पूर्ण शिक्षण ऑनलाइन करता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. विशेषकरून ज्या मुलांची बोर्डाची परीक्षा पुढील काही महिन्यात आहे त्यांना शाळा आणि लॅबमधील शिक्षण आवश्यक आहे. यासोबतच सर्वच मुलांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची क्षमता नाही, असे म्हटले जात आहे.

प्रस्तावित सेफ्टी गाईडलाइनला अंतिम रूप देतेय मंत्रालय
मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनुसार, सध्या सर्वकाही उघडले असताना शाळादेखील काही सेफ्टी गाईडलाइनसह सुरू केल्या जाऊ शकतात. यामध्ये काही वेगळे नाही. सोबतच यासाठी शाळांची जबाबदारी देखील ठरवण्यात येईल, जेणेकरून कोणत्याही सेफ्टी गाईडलाइनचे उल्लंघन होणार नाही. शाळांसाठी या सेफ्टी गाईडलाइन एनसीईआरटीने तयार केल्या आहेत. ज्यामध्ये मुलांमध्ये अंतर ठेवणे, मास्क घालणे, हात साबणाने धुणे, वर्ग दररोज सॅनिटाइज करणे, असेंब्ली आयोजित न करणे, हात धुतल्याशिवाय मुलांना काहीही खाऊ न देणे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

ब्रिटनमध्ये पुढील महिन्यात शाळा उघडणार
आता जगभरात शाळा उघडण्यासाठी हालचाल सुरू आहे. नुकतेच इंग्लंडने सुद्धा महत्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये पुढील महिन्यात शाळा उघडल्या जाणार आहेत. यासोबतच सर्व मुलांना शाळेत येणे आवश्यक केले आहे. जर एखाद्या पालकांनी मुलांना शाळेत पाठवले नाही तर त्यांना दंडदेखील करण्यात येणार आहे.