निवडणूक पथकावर नक्षलवाद्यांचा बेछुट गोळीबार ; पोलिसांचाही गोळीबार

गडचिरोली :  वृत्तसंस्था – गडचिरोलीत मतदान संपताच नक्षलवाद्यांनी पोलीस आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कमांडो पथकावर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवून केलेल्या या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. आज सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील पुरसगोंदी मतदान केंद्रावरुन निघालेल्या पोलीस आणि कमांडो पथकाच्या बेस कॅम्पला नक्षलवाद्यांनी टार्गेट केले.

या नक्षलवाद्यांनी बेस कँम्पजवळ आधी आयडी स्फोट घडवून आणला आणि नंतर कमांडोच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये तीन कमांडो जखमी झाले असून जखमी कमांडोंना हेलिकॉप्टरने नागपूरला उपचारासाठी नेण्यात आले आहे.

नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यानंतर कमांडोंनीही जोरदार प्रत्युत्तर देत त्यांचा हल्ला परतवून लावला. त्यामुळे नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत मतदान केंद्रांना टार्गेट करण्याची आज दिवसभरातील ही दुसरी घटना आहे.