राष्ट्रवादीला मोठा धक्‍का : शरद पवारांनी उमेदवारी दिल्यानंतर नमिता मुंदडांनी केला भाजपमध्ये प्रवेश

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमधील ५ उमेदवारांची घोषणा नुकतीच केली होती. या पाच उमेदवारांपैकी केजच्या उमेदवार नमिता मुंदडा या आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेत नमिता मुंदडा या प्राधान्याने सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांबरोबर त्या मंचावर होत्या. त्यानंतर शरद पवार यांनी बीडमध्ये सर्वात अगोदर पाच उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यात नमिता मुंदडा यांचे नाव केज मतदारसंघातून जाहीर करण्यात आले होते.

विमल मुदंडा यांनी केज मतदारसंघातून ५ वेळा विजय मिळविला होता. सुरुवातीला दोन वेळा भाजपामधून तर पुढे तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसमधून विजय मिळवत मंत्रीपदही पटकाविले होते. त्यांची सून नमिता मुंदडा यांचा २०१४ मध्ये भाजपाच्या संगिता ठोंबरे यांनी पराभव केला होता.

नमिता मुंदडा यांची उमेदवारी जाहीर झाली तरी त्या नाराज होत्या. उमेदवारी जाहीर झाली तेव्हा त्या सभेत नव्हत्या. त्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मिडियावरील साईटवरुन पक्षाचे चिन्ह आणि शरद पवार यांचा फोटो काढला होता. तेव्हा त्या भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर आज त्या बीडमध्ये भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

Visit : policenama.com