‘कंगना इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते, एकतर…’ धनंजय मुंडेंचा निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी कंगणाच्या वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून कंगनावर संताप व्यक्त केला आहे. याच मुंबईने तुमच्या सारख्या अनेकाना आसरा दिला आहे, गॅमलर-करिअर दिलंय. एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते. एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

दरम्यान, अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता . आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते, असे विधान कंगनाने केले होते. याला उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिने मुंबईत येऊ नये, असे म्हटले होते. त्याला कंगनाने ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत यांनी मला धमकी दिली असून पुन्हा मुंबईत येऊ नकोस, असं धमकावले आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आजादी ग्रॅफिटी आणि आता ही जाहीर धमकी, मला मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे, असा सवाल तिच्या ट्विटमध्ये केला आहे. यावरुन सर्वच स्तरातून प्रतिक्रीया उमटत आहेत.

कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा

मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा, असं कंगणाने धमकी देणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. कंगणाने पुढे स्माईल अपलोड करत म्हटलं आहे की, 9 सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईल. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरुन धमक्या देणाऱ्यापैकी कुणामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं ओपन चॅलेंज तिनं धमक्या देणाऱ्यांना दिलं आहे.