‘दु:ख वाटून घेण्याची आपली संस्कृती’, आ. रोहित पवारांचा PM मोदींना टोला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचं संकट अद्यापही कायम आहे. असं असतानाच राज्यात परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्य सरकारपुढं आणखी एक संटक उभं ठाकलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनी केंद्राकडं मदतीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा जीएसटीच्या वाट्याची मागणी केली आहे. दु:ख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत जीएसटीच्या रकमेची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. रोहित पवार म्हणतात, “दु:ख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे. आज बळीराजावर दु:खाचा डोंगर आहे. तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती घेत आहेच. पण केंद्रानंही #GST चे राज्याचे थकीत 28 हजार कोटी रुपये तातडीनं द्यावेत. अन्नदात्याला आणि असंघटीत क्षेत्राला सावरण्यासाठी.”

पावसामुळं झालेल्या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील प्रमुख नेते जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. संकट मोठं असल्यानं केंद्र सरकारनं मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर केंद्र सरकारकडे मदत मिळवण्यासाठी काही निकष आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी वेळ जाणार आहे असं राज्यातील भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या वाट्याच्या जीएसटीच्या परताव्याचा मुद्दा उलचून धरला आहे.