Post_Banner_Top

काँग्रेसच्या EXIT POLLमध्येही NDAची ‘चलती’ ; भाजपाला मिळतील ‘एवढ्या’ जागा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडल्यानंतर विविध वाहिन्यांनी आणि संस्थांनी एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली होती. या एक्झिट पोलमध्ये बहुतांश वृत्तवाहिन्यांनी एनडीए बहुमतापर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी काँग्रेसकडूनही एक्झिट पोल घेण्यात आले. या एक्झिट पोलमध्ये देखील एनडीएला यूपीएपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र भाजपाला दोनशेहून कमी जागा मिळतील आणि एनडीएला केवळ २३० पर्यंत जागा मिळतील असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. तर काँग्रेस स्वबळावर १४० जागा जिंकेल आणि यूपीएला १९५ जागा मिळतील, असाही अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या एक्झिट पोलनुसार यूपीएला तामिळनाडू, केरळ आणि पंजाबमध्ये चांगले यश मिळेल. तसेच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्येही पक्षाची कामगिरी चांगली होणार आहे. यूपीएला बिहारमध्ये १५, महाराष्ट्रात २२ ते २४, तामिळनाडूत ३४ केरळमध्ये १५, कर्नाटकात ११ ते १३ आणि मध्य प्रदेशात ८ ते १० जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. त्याशिवाय गुजरातमध्ये ७, हरियाणात ५ ते ६, छत्तीसगडमध्ये ९ आणि पूर्वोत्त राज्यांत ९ ते १० जागा मिळण्याची अपेक्षा काँग्रेसने केली आहे.

एक्झिट पोलनी काँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ २ जागा दिल्या असल्या तरी या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात ५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, दक्षिण भारतात काँग्रेस आणि एनडीएला चांगले यश मिळेल,अशी अपेक्षा या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आली आहे. देशातील विविध निवडणूक क्षेत्रांत उपस्थित असलेले २६० पर्यवेक्षक, राज्यांचे प्रभारी आणि स्थानिक नेत्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर काँग्रेसने ही आकडेवारी मिळवली आहे.

Loading...
You might also like