ओलींनी पुन्हा केला नेपाळमध्ये ‘असली’ अयोध्या असल्याचा दावा, रामाची मुर्ती बनविण्याचा आदेश, करणार खोदकाम

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा नेपाळमध्ये खरी अयोध्या असल्याचे सांगून श्रीरामाची मूर्ती बनवण्यास आणि भगवान राम यांचे जन्मस्थान म्हणून प्रचार करण्याचा आदेश दिला आहे. चितवनमधील स्थानिक अधिकार्‍यांशी फोनवर बोलताना ओली म्हणाले की, सर्व पुरावे सिद्ध करतात की भगवान रामांचा जन्म नेपाळच्या अयोध्यापुरी येथे झाला होता, भारतात नव्हे. त्यांनी पुरावे गोळा करण्यासाठी उत्खनन करण्याचे आदेशही दिले आहेत. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भूमिपूजन केले असताना ओली यांनी हा दावा केला आहे.

नेपाळमधील आघाडीचे वृत्तपत्र हिमालयन टाईम्सच्या एका वृत्तात म्हटले आहे की ज्या काळात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, त्यावेळी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली लोकांना हे पटवून देण्यात व्यस्त आहेत की भगवान राम यांचे जन्मस्थान चितवनच्या माडी महानगरपालिका क्षेत्रात स्थित अयोध्यापुरी तेथे आहे. ओली यांनी माडी नगर प्रभाग 9 चे अध्यक्ष शिवाहरी सुबेदी, महापौर ठाकूर प्रसाद धकल आदींशी दोन तास चर्चा केली.

सुबेदी यांच्या मते पंतप्रधानांनी शिष्टमंडळाला सांगितले की त्यांना पूर्ण विश्वास आहे की राम यांचा जन्म नेपाळच्या अयोध्यापुरी येथे झाला, भारताच्या उत्तर प्रदेशमध्ये स्थित अयोध्येत नाही. ओली यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना अयोध्यापुरीचा प्रसार आणि ऐतिहासिक पुरावे जपण्यास सांगितले. चितवन जिल्ह्यातील नॅशनल असेंब्लीचे सदस्य दिलकुमारी रावल यांच्या म्हणण्यानुसार, ओली यांनी अयोध्यापुरीच्या आसपासच्या भागांचे संरक्षण करण्याचे आदेश दिले.

रावल यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान ओली यांनी पुरावे गोळा करण्यासाठी अयोध्यापुरी भोवती खोदण्यास सांगितले आहे. अयोध्यापुरीला ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सरकार जागा देणार असल्याचे ओली म्हणाले. त्यांनी शिष्टमंडळाला अयोध्यापुरी भागात भगवान राम, लक्ष्मण आणि सीताच्या मूर्ती तयार करण्यास सांगितले.

काही दिवसांपूर्वी भगवान राम यांचा जन्म नेपाळमध्ये झाला असा दावा करून पंतप्रधान ओली यांनी सर्वांना चकित केले होते. ओलीच्या या वक्तव्याचा निषेध त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आणि नेपाळमधील लोकांनी केला होता. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे नेते बामदेव गौतम यांनी कोणतेही पुरावे न देता असे दावे केल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केली होती.