नगर शहर विधानसभा : महापौर निवडणुकीतील ‘राज’कारण, भाजपातील राठोडविरोधी भूमिकेचा जगतापांना फायदा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर शहर विधानसभा मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरू होती. आपणच जिंकू, या अविर्भावात शिवसेना उपनेते अनिल राठोड होते. मात्र मित्रपक्ष असलेल्या भाजपातील बड्या नेत्यांची नाराजी, महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाला दिलेली साथ, केडगाव हत्याकांडानंतर झालेले राजकारण, या सर्वांचा परिपाक म्हणून शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना मोठा राजकीय फटका बसला व राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे विजयी झाले.
शहरातून विजयी होणे जगताप यांना सोपे नव्हते. मात्र गेल्या वर्षभरापासून जगताप यांच्याकडून राजकीय व्यूहरचना सुरू होती. त्याचाच भाग म्हणून त्यांनी भाजप व शिवसेनेतील मतभेदांचा फायदा घेत महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेना सत्तेपासून दूर राहिली.

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने साथ न दिल्यामुळे शिवसेना व भाजपातील संघर्ष वाढू लागला. माजी खासदार दिलीप गांधी यांचाही राठोड यांना तीव्र विरोध होता. त्या विरोधाचा फायदा जगताप यांनी घेतला. शेवटच्या काही दिवसांत भाजपने सेनेला साथ दिली, अशी चर्चा असली तरी वस्तुस्थिती वेगळी होती. भाजपाच्या नगरसेवकांसह महापौरही आतून राष्ट्रवादीच्या बाजूने उभे होते. शिवसेनेला भाजपाची शहरातून म्हणावी, तेवढी साथ मिळाली नाही. राठोड यांच्याबद्दल असलेली त्यांची नाराजीचा फायदा जगताप यांनी योग्य वेळी उचलला. तसेच केडगाव हत्याकांडानंतर झालेले राजकारणही नगरकरांच्या लक्षात होते. या सर्व बाबींचा एकत्रितपणे राठोड यांच्यावर परिणाम झाला व अकरा हजाराच्या मताधिक्क्याने संग्राम जगताप विजयी झाले.

 माजी महापौर अभिषेक कळमकर व वंचित आघाडीकडून निवडणूक लढविलेले किरण काळे यांच्यामुळे जगताप यांना मोठा फटका बसेल, अशी चर्चा होती. मात्र काळे यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली. एमआयएमचे मिर आसिफ सुलतान यांच्या उमेदवारीचा संग्राम जगताप यांना फटका बसेल, असे सांगितले जात होते. मात्र मुस्लीम समाजाची मते जगताप यांना मिळू शकत नाही. ती मतेच सुलतान यांना मिळाली आहे, असे सांगितले जाते. अतिशय पद्धतशीरपणे निवडणुकीचे नियोजन केल्यामुळे जगताप यांनी शिवसेनेच्षा राठोड यांना पराभवाची धूळ चारली.

 

Visit : policenama.com