विश्लेषणात्मक बातमी : काँग्रेसची नेमकी लढत कोणाशी ?

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरुन घालविण्यासाठी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी तो यशस्वी झालाही. मात्र, लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. तशी विरोधकांमध्ये फाटाफुट झाली. पाच टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर व शेवटचे दाने टप्पे बाकी असतानाही काँग्रेसची लढत नेमकी कोणाशी आहे, असा प्रश्न भाजप नाही तर विरोधकांकडून विचारला जात आहे.

प्रियंका गांधी यांनी बुधवारी नवी दिल्लीत जोरदार रोड शो केला. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जाऊ लागला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला असून जेथे काँग्रेसची भाजपशी थेट लढत आहे. तेथे काँग्रेस व प्रियंका, राहुल गांधी यांनी तेथे प्रचारावर लक्ष द्यावे असा सल्ला केजरीवाल यांनी दिला आहे.

केजरीवाल यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेसची लढाई नेमकी कोणाशी आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिल्लीतील सर्व ७ जागांवर भाजपचे खासदार आहेत. तेथे त्यांची प्रमुख लढत आप शी आहे. आम आदमी पक्षाबरोबरच्या जागा वाटप होऊ न शकल्याने काँग्रेसने सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आता ही लढत तिरंगी झाली आहे. तेथे भाजपला आप सर्वात चांगली लढत देऊ शकत असतानाही काँग्रेसने भाजपविरोधकांच्या मतात फुट पाडत असून त्याचा भाजपला फायदा होणार असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

उत्तर प्रदेशातही समाजवादी पक्ष आणि बसपा यांची महाआघाडी भाजपला जोरदार टक्कर देत असताना तेथे केवळ या दोन पक्षांशी युती न झाल्याने काँग्रेसने सर्व जागांवर उमेदवार उभे केले. तसेच प्रियंका गांधी यांना येथे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी दिली. त्यांनी जोरदार प्रचार करुन सर्व लक्ष पूर्व उत्तर प्रदेशावर केंद्रीत केले होते. त्यामुळे अनेक मतदार संघात आता तिरंगी लढत होत आहे. मात्र, त्याचवेळी उमेदवार निवडून आणू शकेल अशी काँग्रेसची ताकद उत्तर प्रदेशात नाही. त्यामुळे प्रियंकाच्या प्रचाराने भाजप विरोधकांची मते काँग्रेस उमेदवार घेण्याची शक्यता असून त्यामुळे भाजपला त्याचा उलट फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

केजरीवाल यांनी जेथे काँग्रेसची भाजपशी थेट लढत आहे, त्याठिकाणी प्रियंकांनी प्रचार करावा, असे सांगितले आहे. काँग्रेसची भाजपशी थेट लढत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तरांचल या राज्यात आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील मतदान आता पार पडले आहे. महाराष्ट्रसह अनेक राज्यातील उमेदवारांनी प्रियंका गांधी यांच्या रोड शोची मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. मध्य प्रदेश, गुजरातमध्ये प्रियंकांनी रोड शो, प्रचार केला असता तर काँग्रेसला अधिक फायदा झाला असता असे सांगितले जात आहे. पण, त्याचा विचार झाला नाही.

समाजवादी पक्ष आणि बसाप यांनी अमेठी आणि रायबरेली येथे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात उमेदवार दिला नाही. सपा, बसपा बरोबर आघाडी झाली नसली तरी काही जागांबाबत काँग्रेसने त्यांच्याशी समन्वय साधून थेट लढत होईल, हे पाहण्याची आवश्यकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीमधून विरोधकांकडून एकच उमेदवार दिला गेला असता तर तेथे चांगली लढत होऊ शकली असते. पण तेथे सपा आणि काँग्रेसचाही उमेदवार असल्याने विरोधकांच्या मतांमध्ये विभागणी होऊन मोदींचा विजय सुकर झाल्याचे बोलले जाते.

काँग्रेसला आपला पक्ष वाढवायचा असला तरी ते करताना त्यांनी भाजपच्या जागा हिसकावून काँग्रेसने आपला विस्तार करावा, अशी विरोधकांची अपेक्षा होती. मात्र, जेथे भाजप विरोधक जास्त चांगली लढत देऊ शकत असताना तेथेच काँग्रेसने आपली शक्ती लावल्याने काँग्रेसची नेमकी लढत कोणाशी आहे. भाजप शी की त्यांच्या विरोधकांशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.