जुन्या भांडणातून युवकाचा खून, एक गंभीर

गेवराई (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या भांडणातून युवकावर तलवारीने वार करुन खून करण्यात आला असून या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी चारच्या सुमारास गेवराई तालुक्यातील नागझरी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

उत्तरेश्वर भारत पवार (वय-३४) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर नारायण भारत पवार (वय-३६) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे.

गेवराई तालुक्यातील नागझरी येथे पारधी समाजातील दोन गटात आज दुपारी जुन्या भांडणातून वाद झाले. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. उत्तरेश्वर पवार याच्यावर तलवारीने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर नारायण हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मयत आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यामध्ये जुने वाद आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.