दौंडमधून आनंद थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल, प्रमाणिकांना डावलल्याची किंमत राष्ट्रवादीला मोजावी लागणार ?

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि भीमा पाटस कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी दौंड विधानसभेसाठी आज गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये एकच खळबळ माजली आहे.

आनंद थोरात माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे चिरंजीव असून त्यांना धनगर समाजासह सर्वच जाती धर्मामधे मानणारा मोठा वर्ग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काल माजी आमदार रमेश थोरात यांना पक्षाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आनंद थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीतील प्रामाणिक लोकांना डावलले जात असल्याने त्यांचा अंतर्गत वाद विकोपाला गेला असल्याचे आजच्या या घटनेवरून स्पष्ट होत आहे. याबाबत खुद्द आनंद थोरात यांनी बोलताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे आज पर्यंत प्रामाणिक काम करूनही जर आपल्याला डावलले जात असेल तर याची किंमत आता यांना मोजावीच लागेल असे सांगत येत्या आठ तारखेला आपण याबाबत सर्व काही जाहीर करू असे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजभाऊ तांबे यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्याय केला जात असून फक्त राजकीय स्वार्थासाठी वापर केला जातो असा आरोप करत आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून थेट भाजप मध्ये प्रवेश केला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांपैकी आनंद थोरात यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल करून एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला आव्हानच दिले असून त्यामुळे दौंड तालुक्यामध्ये आता राजकीय समीकरणे बदलू लागली असून याची मोठी किंमत राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यामध्ये मोजावी लागणार आहे असे बोलले जात आहे.

Visit : Policenama.com