मुलांना स्नॅक्स देऊ नका, लठ्ठपणासह विविध आजारांचा धोका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बाजारात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे स्नॅक्स मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहे. जी मुलं स्नॅक्स खाण्यावर अधिक भर देतात त्यांना लठ्ठपणासह हृदयाशी संबंधित आजार व मधुमेह जडण्याचा धोका अधिक असतो, असा इशारा वैज्ञानिकांनी नवीन अभ्यासाद्वारे दिला आहे.

अशा अल्पवयीन मुलांमध्ये चयापचयाशी संबंधित आजाराचा धोका अधिक असल्याची बाब अभ्यासात नमूद करण्यात आली आहे. तासन्तास वेळ घालवत असताना मुले मोठ्या प्रमाणात चटपटीत स्नॅक्स खाण्यावर भर देतात; पण यामुळे चयापचय सिंड्रोमची जडण होऊन उच्च रक्तदाब, कमरेभोवती अतिरिक्त चरबी वाढणे, कोलेस्टरॉल व ट्रायग्लिसराइडची पातळी वाढू लागते. यामुळेच संबंधित अल्पवयीनला हृदयाशी संबंधित आजार, स्ट्रोक व मधुमेह जडण्याचा धोका अधिक असतो, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. स्नॅक्स खाणे कमी केल्यास चयापचय सिंड्रोमचा धोका कमी होऊ शकतो.

पौगंडावस्थेतील मुलांमधील हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित घटकाचा अभ्यास करताना ब्राझीलमधील शालेय मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी १२ ते १७ वयोगटातील जवळपास ३४ हजार मुला-मुलींचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास ६० टक्के मुलींचा समावेश होता. यापैकी अर्धे अल्पवयीन हे शारीरिकदृष्ट्या कृतिशील होते. ८५ टक्के जण सामान्यत: टीव्ही पाहताना स्नॅक्स खातात. तर ६४ टक्के अल्पवयीन संगणक किंवा व्हिडिओ गेम खेळताना स्नॅक्स खात असल्याचे म्हटले आहे.