‘दगडा’ पेक्षा ‘विट’ मऊ, भाजपला ‘पाठिंबा’ देणारे ‘अपक्ष’ आता आमच्या संपर्कात : जयंत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नसून सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यावेळी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर आज (रविवार) शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या कोअर कमेटीची बैठक पुण्यामध्ये बोलावली आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप पेक्षा शिवसेना म्हणजे दगडा पेक्षा विट मऊ असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केले.

राष्ट्रवादीत मेगा भरती नाही
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मेगा भरती करत अनेकांना पक्षात प्रवेश दिला. त्याच धरतीवर राष्ट्रवादीमध्ये मेगा भरती कधी होणार ? असे विचारले असता जयंत पाटील यांनी राष्ट्रावादी मध्ये मेगा भरती होणार नाही. मात्र मेरीटवर भरती करणार असल्याचे सांगत भाजपमध्ये गेलेले आणि भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार संपर्कात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, संपर्कात असलेल्या आमदारांची नावे सांगून त्यांना अडचणीत आणणार नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.

मुनगंटीवारांना टोला
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच गोड बातमी येईल असे सांगितले होते. मात्र, अद्याप तरी कोणतीही गोड बातमी आलेली नाही असा टोला त्यांनी लगावला. राज्यात स्थिर आणि पाच वर्षे टिकणारे सरकार येणार असल्याचा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील सत्ता स्थापनेचा निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते घेणार आहेत. तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीत एकत्र बसून मसुदा तयार करतील आणि त्यानंतर पुढील निर्णय जाहीर केला जाईल.

किती जवळ जायचे ते ठरवावे लागेल
सत्तास्थापनेबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, आम्ही सुरुवातीपासूनच विरोधात बसण्याचे बोलत आहोत. विधानसभा निवडणुका ज्यांच्या विरोधात लढलो त्यांची आणि आमच्यातील विचार भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत किती जवळ जायचे हे ठरवावे लागेल असे सांगत भाजपसोबत जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही पक्षांचे नेते दिल्ली भेटणार आहेत. त्यावेळी सत्ता स्थापनेबाबत मसुदा तयार करण्यात येईल. शिवसेनेसोबत जात असताना ज्यांनी आम्हाला साथ दिली त्या घटक पक्षांना देखील विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करावी लागणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Visit : Policenama.com