जेजुरी नगरपालिकेने उभारली ‘माणुसकीची भिंत’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शिवाजी चौकामध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. त्यात ‘नको ते ठेवून जा . . . आणि पाहिजे ते घेऊन जा . . .’ अशी मोकळेपणाने मिळणारी मदत सर्वसामान्याच्या उपयोगी पडावी, यासाठी ‘माणुसकीची भिंत’ तयार केली आहे. या उपक्रमाला दोनच दिवसांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

शिवाजी चौकामध्ये जिल्हा परिषद शाळेसमोर एक भिंत उभारली आहे. रिकाम्या बाटल्यांमध्ये वाळू माती भरून बाटल्यांवर सिमेंटचा थर देत भिंत उभारली आहे. या भिंतीलगत वस्तू व कपडे ठेवण्यासाठी जागा तयार केली आहे. कडेला बोर्ड लावून नागरिकांचे लक्ष वेधले आहे. या भिंतीला ‘माणुसकीची भिंत’ असे नाव दिले आहे. आपल्याला लागत नसलेल्या वस्तू अथवा कपडे आपण त्याठिकाणी आणून ठेवायच्या आणि ज्यांना गरज असेल त्यांनी त्या वस्तू घेऊन जायच्या. दोनच दिवसांत अनेकांनी येथे वापरात नसलेले व चांगले कपडे येथे आणून ठेवले. गरज असलेले ते घेऊन जात आहेत.

या उपक्रमाची सुरुवात गुरुवारी बाजाराच्या दिवशी पालिकेचे गटनेते सचिन सोनवणे, प्रशांत लाखे, अशोक भोसले, काळूराम दोडके, समीर बागवान, गणेश गाढवे, विशाल बारभाई यांच्या उपस्थितीत झाली. गणेश गाढवे यांनी पुढाकार घेत घरातील वापरात नसलेले व चांगले कपडे येथे ठेवण्यासाठी आणले. त्यानंतर अनेकांनी येथे कपडे व इतर वस्तू ठेवण्यास सुरुवात केली. शहरातील गरजू लोक ते घेऊन जात आहेत. शहरातील तरुणांचा यामध्ये चांगला सहभाग आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/