शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या खरेदी-विक्री केंद्रांवरच द्राक्षेमणी विक्रीस आणावा : मोतीराम मोगल

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगाम सुरू झाला असुन द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणा-या द्राक्षेमण्यांना रास्त बाजारभाव मिळणेसाठी उत्पादकांनी त्यांचे द्राक्षेमणी शेतावर विक्री न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रावरच विक्रीस आणावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य मोतीराम मोगल यांनी उगांव येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी केले.

प्रारंभी मोगल यांचेसह इतर मान्यवरांच्या हस्ते द्राक्षेमणी क्रेटस् चे विधीवत पुजन करण्यात आले. मुहूर्तावर पतिंगराव ढोमसे यांचा द्राक्षेमणी रू. 22/- प्रती किलो या दराने विक्री झाला.

लिलाव शुभारंभ प्रसंगी मोगल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, उगांव व परीसरातील द्राक्षे उत्पादकांच्या मागणीनुसार बाजार समितीने दि. 26 जानेवारी, 2004 पासुन उगांव येथे द्राक्षे हंगामात द्राक्षेमणी लिलावास सुरूवात केली होती. गेल्या 14-15 वर्षात या केंद्रास शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला असुन बाजार समितीच्या सदर उपक्रमामुळे शेतक-यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. बाजार समितीने सदरचे खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यापुर्वी द्राक्षेमणी खरेदीदार थेट शेतक-यांच्या शेतावर जाऊन शिवार खरेदीद्वारे अत्यंत कमी भावात द्राक्षेमण्याची खरेदी करून वजनमापातही शेतक-यांची फसवणुक करीत असे. शिवाय सुरूवातीस काही रक्कम देऊन नंतर पैसे बुडविण्याचे प्रकार होत असे. सदर प्रकारांना आळा घालण्यासाठी बाजार समितीने शेतकरी हित विचारात घेऊन दरवर्षी द्राक्षे हंगामात उगांव, नैताळे, विंचुर, लासलगांव व खानगांव नजिक येथे द्राक्षेमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उगांव येथे दरवर्षी द्राक्षेमण्यांच्या खरेदी-विक्रीतुन अडीच ते तीन कोटी रूपयांची उलाढाल होते. द्राक्षेमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षेमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतात. त्यामुळे द्राक्षे उत्पादक बांधावर द्राक्षेमणी विक्री न करता सदर खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षेमणी विक्रीस प्राधान्य देतात.

याप्रसंगी बाजार समितीचे सदस्य नंदकुमार डागा, वैकुंठ पाटील, सचिव नरेंद्र वाढवणे, सहाय्यक सचिव प्रकाश कुमावत, विजय ढोमसे, अंबादास पानगव्हाणे, छोटुकाका पानगव्हाणे, पृथ्वीराज ढोमसे, मनोज पानगव्हाणे, द्राक्षेमणी खरेदीदार कृष्णा मापारी, दिलीप साबळे, रावसाहेब घुमरे, प्रमोद राठी, हर्षद राठी, राजाराम मापारी, दत्ता मापारी, एकनाथ आहेर, बी. डी. ढोमसे, गोरख मापारी, नवनाथ मापारी, मोहन ढोमसे, शांताराम चव्हाण, बाळाजी साबळे, राजु साबळे, खरेदी-विक्री केंद्राचे प्रभारी हिरालाल सोनारे, वैभव वाघचौरे, ज्ञानेश्वर जगताप, तुषार शेजवळ यांचेसह परीसरातील शेतकरी उपस्थित होते.