माजी महापौरांना धक्काबुक्कीचा आ. जगतापांना ‘फटका’, उमेदवारीनंतरच बॅनरवर ‘घड्याळ’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी आमदार संग्राम जगताप यांच्या बॅनरवरून विद्यमान आमदार असूनही घड्याळ चिन्ह गायब झाले होते. कार्यकर्ते प्रचार करत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख केला जात नव्हता. पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या बॅनरवर घड्याळ दिसू लागले आहे. तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांना जगताप समर्थकांनी काही दिवसांपूर्वी धक्काबुक्की केली होती. त्यामुळे कळमकर यांच्या नाराजीचा मोठा फटका आ. संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळे जगताप गट अस्वस्थ आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे जोरदार प्रयत्न सुरु होते. मात्र शिवसेनेने नकार दिल्यानंतर आ. संग्राम जगताप यांनी प्रचार सुरू केला. मात्र पक्षाच्या बॅनरवरून घड्याळ चिन्ह गायब झाले होते. शेवटपर्यंत त्यांचा शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न सुरू होता. शिवसेनेने अनिल राठोड यांना एबी फार्म दिल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह दिसू लागले आहे. त्यांच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असूनही घड्याळ गायब झाले होते.

तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर हे आ. संग्राम जगताप यांच्यावर नाराज आहेत. आ. जगताप समर्थकांनी शरद पवार यांच्या सभेनंतर कळमकर यांना धक्काबुक्की व चपलेने मारहाण केली होती. याबाबत फिर्याद देण्यासाठी कळमकर हे कोतवाली पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र तडजोड केल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला. त्यामुळे कळमकर यांची जगताप यांच्याबद्दल नाराजी आहे. तोडगा निघाल्याचे दाखवले जात असले, तरी आतून मात्र वेगळे चालू आहे. माजी महापौर कळमकर हे विधानसभा निवडणुकीत जगतापांचे काम करतील, अशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादीचा मोठा गट जगताप यांच्यावर नाराज आहे. याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळे जगताप समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

visit : Policenama.com