खा.सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी सरसावली

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौंड तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रचारासाठी चांगलेच सरसावल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार रमेश थोरात, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दौंड तालुक्यात प्रचाराची मोहीमच उघडल्याचे पहायला मिळत असून त्यांच्या सोबत जिल्हापरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष माऊली शेळके, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अजित शितोळे, तालुका युवकचे अध्यक्ष विकास खळदकर हे जोमाने काम करताना दिसत आहेत.

विविध गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना खा.सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामाबाबत आणि त्यांच्या ध्येय धोरणांबाबत माहिती देताना दिसत आहेत. भाजपच्या गोटातही प्रचार मोहीम जोरात सुरू असून आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यासाठी रणनीती आखून ते स्वतः बाहेरील तालुक्यांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचार करताना दिसत आहेत. लोकसभेच्या भाजप उमेदवार कांचन कुल, माजी आमदार रंजना कुल याही दौंड तालुक्यामध्ये गावभेट दौरे घेत असून आपल्या कार्यकर्त्यांसह भेटी गाठी घेताना दिसत आहेत. एकंदरीतच हि निवडणूक आता कार्यकर्त्यांनीच अंगावर घेतली असून राष्ट्रवादी आणि भाजप चे कार्यकर्ते अहोरात्र झटून आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल असा प्रयत्न करताना दिसत आहेत.