३ लाख रूपयाच्या लाच प्रकरणी पोलिस हवालदारासह एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चक्क पोस्टमार्टममध्ये बदल करून देतो असून सांगून ३ लाख रूपयाच्या लाचेची मागणी करणारा पोलिस हवालदार आणि त्याच्या जवळील एकजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन) जाळयात अडकले आहेत. लाच मागितल्याप्रकरणी पोलिस हवालदार आणि खासगी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस हवालदार राजू गोपाळ आर्य (पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय, सलग्न नियंत्रण कक्ष, बक्कल नं. १७८१) आणि संदीप जाधव (रा. अवसरी, मंचर, ता. आंबेगाव) यांच्याविरूध्द ३ लाख रूपयाची लाच मागितल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेच्या बहिण, बहिणीचे पती आणि त्यांच्या मुलाविरूध्द मंचर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४९८(अ), ३०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यांना त्या गुन्हयात अटक करण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तक्रारदार यांच्या नातेवाईकांच्या विरूध्द दाखल गुन्हयातील मयत व्यक्ती (तक्रारदार महिलेच्या बहिणीची सून) हिच्या मृत्युबद्दल वैद्यकीय अधिकारी ग्रामीण यांनी पोस्टमार्टम करून अहवाल दिला. त्या अहवालाच्या अनुषंगाने ससून हॉस्पीटल येथून डॉक्टरांच्या पॅनेलकडून मत मागविण्यात आले होते. त्यावेळी पोलिस हवालदार राजू आर्य आणि संदीप जाधव यांनी तक्रारदार महिलेशी संपर्क साधला आणि पोस्टमार्टम रिपोर्टमधील मृत्युच्या कारणांबद्दलच्या अहवालामध्ये बदल करून देतो असे सांगुन ३ लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार महिलेने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची दि. २८ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावरून आज (दि.६ ऑगस्ट) दोघांविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अ‍ॅन्टी करप्शनचे पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक श्रीहरी पाटील आणि उप अधीक्षक प्रतिभा शेंडगे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा तपास उप अधीक्षक प्रतिभा शेंडगे करीत आहेत. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा अन्यथा अ‍ॅन्टी करप्शनच्या कार्यालयात तक्रार करावी असे आवाहन अधीक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –