पुण्यात चोरटे मालामाल ! 11 महिन्यात 7 कोटी ‘गायब’, पोलिसांना ‘आव्हान’, नागरिक ‘चिंताग्रस्त’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणेकरांच्या स्वप्नांची धुळधांड उडवत घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी बंद घरांवर डल्ला मारून 11 महिन्यांत तब्बल 7 कोटींचा ऐवज पळवून नेत मालामाल होण्याचे त्यांचे स्वप्न मात्र, पुर्ण केले आहे. गेल्या काही वर्षांत घरफोड्यांचा सुळसुळाट काही केल्या थांबत नसून, पोलीसांसाठी हे आव्हान कधी पेलवणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यंदाच्या नवीन वर्षात तरी या घटना रोखण्यात पोलीस यशस्वी ठरणार का, हेही पहावे लागणार आहे. विशेष म्हणजे, कामगिरी बोटावर मोजण्या इतकीच आहे.

पुणेकरांच्या समोर वाहतूक कोंडी पेक्षा चिंता आहे ती घरातील मौल्यवान ऐवज जपण्याची. कामानिमित्त घर बंदकरून जाताच कधी चोरटे येऊन कमावलेल्या पुंजीवर डल्ला मारतील याचा नेमच राहिलेला नाही. तास-दोन तासांसाठीही घर बंद होताच, चोरटे कुलूप उचकटून घरातील किंमती ऐवज नेत आहेत. त्यामुळे पुणेकर भितीच्या छायेखाली आहेत. घरफोड्या पाळत ठेवून केल्या जातात. पोलिसांना पाठलागकरूनही चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. हातावर मोजण्या इतक्या घरफोड्या उघडकीस केल्यानंतर टिमकी मिरविणार्‍या पोलीस कोट्यवधी रुपयांच्या घरफोड्या विसरून जातात.

गुन्हे शाखेचा तर ताळमेळच बसत नसल्याचे वास्तव आहे. त्यापेक्षा स्थानिक पोलीस सरस ठरत असून, वानवडी पोलिसांनी दररोजचे कामकरून घरफोड्या करणारी मोठी गँग पकडली. जवळपास 70 हून अधिक घरफोड्या उघड करत लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला. पण, गुन्हे शाखेला मात्र, यश मिळत नसून आठवड्याला वरिष्ठांना या 3 विषयांवर काम सुरू असून, टीम त्यांच्या मागे आहेत, असेच सांगितले जात आहे.

पण एकूणच कधी-काळी दणकेबाज कारवाईसाठी नावारुपाला आलेली गुन्हे शाखा सध्या डबघाईला आली अशीच म्हण्याची वेळ आली आहे. पुणेकरांची झोप उडविणार्‍या घरफोड्या, सोन साखळी, लुटमार,  पीएमपीएलमध्ये होणार्‍या चोर्‍या अन दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोसातून कधी सुटका होणार असा प्रश्न पुणेकर विचारू लागले आहेत.

महिना— गेला माल—मिळाला माल…
जानेवारी–19980300–409700
फेब्रुवारी– 4289000–451980
मार्च—-2449480–427200
एप्रिल— 6321464–2218100
मे—–4658220–72000
जुन—1303200–94300
जुलै— 11165742–3492200
ऑगस्ट–6478240–598270
सप्टेंबर–6907600–1870840
ऑक्टोंबर–4372520–42000
नोव्हेंबर–3242800–429020
एकूण– 71168566– 10105610