राज ठाकरे ठरताहेत निवडणुक आयोगाची ‘डोकेदुखी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी शिवाजी पार्कवरील सभा नेहमीप्रमाणेच दणदणीत झाली. त्याचवेळी त्यांनी राज्यात ८ ते १० सभा घेण्याची घोषणाही केली. त्यामुळेच ठाकरे यांनी निवडणुक आयोगासमोर एक मोठी समस्या निर्माण केली असून ते आता डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही. ठाकरे हे भाजपला विरोध करीत असले व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देत असले तरी ते सभा मात्र, आपल्या पक्षाच्या नावावर घेत आहे. पण रिंगणात त्यांचा उमेदवारच नाही. त्यामुळे या सभांचा खर्च कोणत्या उमेदवारांच्या नावाने टाकायचा हा प्रश्न पडला आहे. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत असले तरी या महाआघाडीच्या वतीने त्यांची सभा आयोजित करण्यात आलेली नाही की त्यांचा उमेदवार तेथे स्टेज वर येत नाही. त्यामुळे या उमेदवारांच्या नावाने खर्च टाकता येणार नाही. दुसरीकडे भाजप उमेदवारांनी राज ठाकरे यांनी महाआघाडीला पाठिंबा दिला आहे. ते त्यांचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेचा खर्च महाआघाडीच्या उमेदवारांच्या खर्चात धरावा, अशी मागणी केली तर करायचे काय असा प्रश्न निवडणुक आयोगाला पडला आहे. काहीही केले तरी पक्षपाती केल्याचा आरोप होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभा निवडणुक आयोगाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणार आहे.