माझे नाव ‘CM’ पदाच्या शर्यतीत असले तरीही शिवसैनिकांची ‘ही’ इच्छा, संजय राऊतांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन करणार हे आता जवळ जवळ निश्चित झाले आहे. शिवसेनेतून मुख्यमंत्री पदासाठी सध्या संजय राऊत यांच्या नावाची चर्चा देखील सुरु होती मात्र माझ्यासोबत सर्व शिवसैनिकांची हीच इच्छा आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच राज्याचे नेतृत्व करत मुख्यमंत्री व्हावे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिवसेनेला पुन्हा विचारणा झाली असल्याचे देखील बोलले जात होते मात्र राऊत यांनी या गोष्टीचे खंडन केले आहे. जरी असे काही पुन्हा विचारले गेले तरी आता आम्हाला भाजपकडून दिलेले मुख्यमंत्री काय इंद्रपद देखील नको आहे असे संजय राऊत यावेळी म्हणाले. शिवसेना राज्यात स्थिर सरकार देईल आणि पाच वर्ष मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल देखील राऊत यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

काल रात्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात उशीरा भेट झाली त्यानंतर शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या नावाला मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती दिली असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे त्यामुळे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच होतील आणि राज्याचे नेतृत्व करतील असे राऊत यांनी स्पष्ट केले.

भाजप विरोधी बाकावर
राज्यातील सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपला मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागणार आहे. अशात जर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर भाजपकडून विरोधी पक्ष नेता कोण होणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. अशा वेळी माजी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः विरोधी पक्षनेता म्हणून बसणार की, इतर कोणाला बसवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Visit : Policenama.com