विखे-पवार घराण्यातील संघर्षाचा आघाडीला फटका !

नगर, शिर्डीतील पराजयात राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींचा अप्रत्यक्ष हात ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात मोदी नावाच्या त्सुनामीमुळे महायुतीला मोठे यश मिळाले. या त्सुनामीचा नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातही महायुतीच्या उमेदवारांना निश्चितच फायदा झाला. परंतु, त्यासोबतच आघाडीच्या नेत्यांच्या चुका, हेही महत्वाचे कारण आहे. अनेक वर्षांपासून लोणीचे विखे व बारामतीचे पवार या दोन कुटुंबातील संघर्षाचा फटका नगरमध्ये बसला व आघाडीच्या नगर, शिर्डी या दोन्ही जागांचे नुकसान झाले, असे राजकीय तज्ज्ञांकडून बोलले जाऊ लागले आहे.

निवडणुकीपूर्वी तीन वर्षांपासून डॉ. सुजय विखे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तयारी करीत होते. आघाडीच्या जागावाटपात नगरची जागा राष्ट्रवादीकडे असली, तरी सदरची जागा काँग्रेसला मिळेल, या आशेने विखे तयारी करीत होते. परंतु यात मोठा अडसर ठरला, तो पवार-विखे कुटुंबियातील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षाचा. त्या वैयक्तिक संघर्षामुळे शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला देण्यास स्पष्ट नकार दिला. अगदी त्यावरून खालच्या पातळीपर्यंत टीका झाली. मुलांचे हट्ट पुरविण्यासाठी आम्ही बांधील नाही, अशा पद्धतीची टीकाही करण्यात आली होती. पवार यांनी विखेंसाठी नगरची जागा सोडण्यास नकार दिल्याने भाजपात प्रवेश केला. पवार यांनी काँग्रेसला जागा नसल्यामुळे व विखे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने त्यांनी कमळाची साथ जोडली. भाजपने विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून नवख्या सुजय यांना संधी देण्याचा शब्द दिला. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादीला उमेदवाराची शोधाशोध करण्यातच अनेक दिवस घालवावे लागले. ऐनवेळी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली.

विखे यांच्या भाजप प्रवेशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भाजप आ. शिवाजी कर्डिले यांच्या जावयाला उमेदवारी देऊन पवार यांनी विखेंवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न पवारांच्याच अंगलट आला. दोन्ही पक्षांनी नगरची जागा अतिशय प्रतिष्ठेची केली. शरद पवार यांनी नगरच्या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. भाजपनेही ही जागा प्रतिष्ठेची करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघात 2 स्वतंत्र सभा घेतल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा झाली. या सभेत ही मुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान एकदा व मुख्यमंत्री तीन वेळेस मतदारसंघात आले होते. राष्ट्रवादीचे शरद पवार हेही अनेक वेळा नगरला आले. दोन्ही बाजूने नगरची जागा अतिशय प्रतिष्ठेची केली गेली. परंतु तरीही विखे यांची रणनीती व मोदींची लाट यात सुजय विखे यांनी बाजी मारली.

विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे नाराज झालेले भाजपचे कार्यकर्त्यांचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेता आला नाही. आघाडीकडून सुजय विखे व भाजप खा. दिलीप गांधी यांच्यात निवडणूक झाली असती, तर त्यातही विखेंनी बाजी मारली असती. परंतु राजकीय समीकरणांचा विचार न करता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वैयक्तिक वैर महत्त्वाचे मानून त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांचे मताधिक्य वाटले व तब्बल दोन लाख 81 हजार यांची आघाडी घेऊन विख विजयी झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राधाकृष्णन विखे यांचे पक्षांतर्गत विरोधक आ. बाळासाहेब थोरात यांनाही विखे यांचा प्रभाव नको होता. त्यामुळे त्यांनीही विखेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. नगरच्या जागेवरून नाराज झालेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघात आघाडीच्यावतीने त्यांचे कट्टर समर्थक आ. भाऊसाहेब कांबळे यांनी उमेदवारी मिळालेली असतानाही विखेंची सर्व यंत्रणा महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या बाजूने उभी केली. कांबळे यांना मिळालेली मते पाहता त्यांनी कांबळे यांच्या बाजूने सर्व यंत्रणा उभी केली असती, तर कदाचित चित्र वेगळे पहायला मिळाले असते. सहाजिकच पवार व विखे घराण्यातील वादाचा फटका नगरमध्ये आघाडी बसला व जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीच्या पारड्यात पडल्या, असे राजकीय तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. एकमेकांची जिरविण्यातच आघाडीचे नुकसान झाले, असे बोलले जाऊ लागले आहे.

वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारांनी बऱ्यापैकी मते मिळविली असली, तरी त्यांचा विशेष प्रभाव जाणवला नाही. शिर्जीत अपक्ष म्हणून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे नशीब अजमावत होते. परंतु त्यांनाही समाधानकारक मते मिळवता आली नाहीत. पवार यांनी नगर व औरंगाबाद या जागेची अदलाबदल केली असती, तर कदाचित राज्यातील आघाडीचा दोन-तीन जागा वाढल्या असत्या, अशी चर्चा आहे.