पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी १५ वर्षे दुरावलेले मायलेकाचे नाते पुन्हा जुळवले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पतीच्या निधनानंतर त्या माऊलीने दोन्ही मुलांना आपल्या हिमतीवर वाढविले. दोघांची लग्न करुन दिली. पण संसारात भांड्याला भांडे लागणार, ते या घरातही वाजत होते. त्यात नोकरीनिमित्त दोघेही दुसऱ्या गावाला गेले आणि ही माऊली एकटी पडली. तिची कथा समजल्यावर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचे समुपदेशन करुन १५ वर्षापासून दुरावलेल्या मायलेकाला एकत्र आणले. साहेब झालेल्या मुलाने आता आईचा सांभाळ करेन, असे वचन आयुक्तांना दिले.

प्रमिला नाना पवार (वय ६१, रा. नंदुरबार) यांची ही कथा चौकोनी कुटुंबातील व्यथा व्यक्त करणारी आहे. त्यांचा एक मुलगा सतीश वस्तू व सेवा कर विभागात वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरीला लागला. दुसर आतीश परिवहन महामंडळामध्ये कंडक्टर आहे. दोघेही नोकरी निमित्त नाशिक व नंदुरबारला राहतात. सतीश वस्तू व सेवा कर विभागात अधीक्षक बनला पण आई मात्र एकटी राहते. प्रमिला पवार यांचे म्हणणे आहे की, दोन्ही मुले त्यांचा संभाळ करत नाहीत. सुना त्रास देतात. म्हणून त्या इतरत्र भटकंती करत राहतात. तीन चार दिवसांपूर्वी प्रमिला पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. आपला मुलगा सतीश पवार हा फौजदार आहे व तो सांभाळ करीत नाह, असे त्यात म्हटले होते. नाशिक चे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पहाण्यात ही पोस्ट आली. त्यांनी तातडीने सतीश पवार यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. तेव्हा सतीश नाना पवार हे वस्तू व सेवा कर विभागात निरीक्षक असल्याचे दिसून आले. नांगरे पाटील यांनी प्रमिला पवार, त्यांचा मुलगा सतीश, सुन सीमा यांना पोलीस आयुक्तालयात समक्ष बोलावले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तिघांना समोरासमोर बसवून त्याचे समोपदेशन केले. एकमेकाविषयी असलेले गैरसमज दूर केले. त्यानंतर सतिश याने आपल्या आईला व आईने आपल्या मुलाला पेढा भरवून गैरसमज दूर झाल्याचे सांगितले.

या पुढे सर्व जण एकत्र राहतील अशी ग्वाही नांगरे पाटील यांना दिली. दोघांनीही विश्वास नांगरे पाटील यांना आईचा सांभाळ करु असे वचन दिले. त्यांना नांगरे पाटील यांनी आशिर्वाद दिले. सर्वांच्या साक्षीने तिघांनीही भावपूर्ण वातावरणात एकत्र राहण्यासाठी पोलीस आयुक्तालयाचा निरोप घेतला.