जुनी जेजुरीची प्राथमिक शाळा बिटपातळीवर ठरली अव्वल

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेत जुनी जेजुरी येथील प्राथमिक शाळेतील मुलांनी प्रत्येक स्पर्धेत आपल्या खेळाची वेगळी चमक दाखवत भरघोस पारितोषिके पटकावून बीट पातळीवर आपली शाळा अव्वल ठरवली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच त्यांचा शारीरिक-मानसिक विकास व्हावा त्याचबरोबर त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीन घडवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धांचे शाळा, केंद्र, बीट, तालुका, व जिल्हा पातळीवर आयोजन करत असते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी मोलाची संधी मिळते. खरेतर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपेक्षित, वंचित, गोरगरीब शेतकरी, कष्टकरी व आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या पालकांची मुले शिक्षण घेत असतात. खाजगी शाळेच्या झगमगटा पुढे जिल्हा परिषदेच्या पालकांच्या परिस्थितीमुळे टापटीप पणा दिखाऊपणा यात मागे राहतात. पुढील शिक्षणासाठी इतर शाळेत गेल्यानंतर त्यांच्यात न्यूनगंड तयार होऊ नये. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्यात सभाधीटपणा यावा यादृष्टीने या स्पर्धा विद्यार्थ्यांना अतिशय दिशादर्शक ठरतात.

दिनांक ४ डिसेंबर रोजी जेजुरी बीटमध्ये धालेवाडी येथे जेजुरी बीटच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संभाजी काळाने यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी धालेवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख उज्वला नाझरेकर, नाझरे केंद्राचे केंद्रप्रमुख सतीश कुदळे, वाळुंज केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल जगदाळे, शिक्षक संघाचे नेते दत्तात्रय गायकवाड, पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक संजय जमदाडे त्याचबरोबर जेजुरी बीट मधील शिक्षक व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.