मतदानापूर्वीच निलेश राणेंना धक्का

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार निलेश राणे जोरदार धक्का बसला आहे. रत्नागिरीचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसोबत १८ पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १४ मतदार संघांचा समावेश आहे. या १४ मतदार संघामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.

मतदानाला केवळ दोन दिवस राहिले असतांनाच रत्नागिरीचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे,गुहागर तालुकाध्यक्ष राजेंद्र साळवी, खेड तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, महिला जिल्हाध्यक्ष मेघना मंगेश शिंदे, स्वाभिमान कातकरी समाज जिल्हाध्यक्ष विलास निकम, दिप्ती चव्हाण, विलास जाधव, विश्वनाथ शेट्ये, प्रकाश निवाथे, राजेंद्र साळवी, राजेंद्र शिंदे, शशिकांत निकम, संजय जगताप, दीपक चव्हाण, कपिल काताळकर, मनोज पवार, शशिकांत शिंदे, निता निकम या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

याचबरोबर, युवक जिल्हाध्यक्ष वैभव विरकर यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नसून ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत आणि काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांच्यात लढत आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते. २००९ मध्ये ते निवडूनही आले होते. २०१४ विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र आता राणे काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत.