अखेर : सात वर्षानंतर ‘निर्भया’ला न्याय, चारही नराधमांना एकाच वेळी तिहार जेलमध्ये फाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पहाटे सर्वांना अंघोळ करायला सांगितले. त्यानंतर त्यांना घेऊन सहा गार्ड प्रत्येकाला घेऊन फाशी गेटवर आले. त्यांचे हात मागे बांधण्यात आले.  त्यांच्या डोक्यावर काळे फडके बांधण्यात आले. त्यांना तक्तावर उभे करण्यात आले. त्यानंतर गळ्यात दोर बांधण्यात आला. बरोबर साडेपाच वाजता जेल सुप्रिरिटेंड यांनी हातातील रुमाल उचांवून खाली टाकला. त्याबरोबर जल्लादने खटका ओढला. त्याबरोबर चौघांचेही देह खाली गेले. थोड्या वेळाने त्यांना खाली उतरविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांचा मृत्यु झाल्याचे जाहीर केले. त्याबरोबरच तब्बल ७ वर्षांनी निभर्याला अखेर न्याय मिळाला.

न्यायालयाच्या सर्व प्रकारचे हातखंडे वापरुनही आरोपींना फाशी टाळण्याचे प्रयत्न संपल्यानंतर अखेर शुक्रवारी पहाटे निभर्याचा नराधमांना दिल्लीतील तिहार तुरुंगात फासावर लटविण्यात आले. अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश कुमार सिंह या चौघाना एकाच वेळी फाशी देण्यात आले. या खटल्यातील चार आरोपीपैकी दोषी मुकेश कुमार सिंह याची दया याचिका फेटाळण्याच्या राष्ट्रपती यांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ते न्यायालयाने फेटाळले़ शेवटचा उपाय म्हणून त्याने गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. गुरुवारी न्यायालयाने त्याचा हा दावाही फेटाळून लावला. त्यानंतर चौघांच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला होता. या पूर्वी या चौघांच्या फाशीची तारीख दोन वेळा निश्चित केल्यानंतरही वकिलांनी वेगवेगळी कारणे काढून न्यायालयात धाव घेऊन फाशी रोखण्याचा प्रयत्न केला होता. या अगोदर न्यायालयाने चौघांना फाशी देण्यासाठी २२ जानेवारी ही तारीख निश्चित केली होती. त्याचे वारंटही काढण्यात आले होते.

२०१२ मध्ये दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या या प्रकरणाने संपूर्ण देशात हलचल माजली होती़ देशभरातील तरुणाई रस्त्यावर येऊन  आंदोलन करु लागली होती़. या निर्भया केसमुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर देशभर विचार मंथन झाले़ अत्याचारांचे खटल्यांची सुनावणी स्वतंत्र विशेष न्यायालयात होऊ लागली़ कायद्यात अनेक बदल करण्यात आले़ त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे पिडित महिलेचे नाव गुप्त ठेवण्याचा कायदा कठोर करण्यात आला़ तिचे नाव सार्वजनिक न करण्याचे आदेश दिले गेले़ त्यातूनच या पिडिताचा उल्लेख निर्भया असा केला जाऊ लागला़.

घटनाक्रम
१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील बसमध्ये २३ वर्षाची ही विद्यार्थी आपल्या मित्राबरोबर जात असताना सहा जणांनी तिच्यावर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला़ त्यानंतर तिला व तिच्या मित्राला चालत्या बसमधून फेकून दिले होते़ सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले़ दुसऱ्या दिवसांपासून या अत्याचाराविरोधात देशभर आंदोलने सुरु झाली़ पोलिसांनी बसचालक राम सिंह, त्याचा भाऊ मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता या आरोपींची नावे उघडकीस आणली़ पुढच्या २४ तासात पोलिसांनी राम सिंहसह चौघांना अटक केली़. २२ डिसेंबरला अक्षयकुमार सिंह याला बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली.पिडिता निर्भयाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला उपचारासाठी विमानाने सिंगापूरला नेण्यात आले.
२९ डिसेंबर रोजी निर्भयाचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचे ३०२ कलम जोडले.
२ जानेवारी २०१३ रोजी तत्कालीन मुख्य न्यायाधीश अल्तमस कबीर यांनी अत्याचाराच्या खटल्याची सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाचे उद्घाटन केले.
३ जानेवारी ला पाच जणांविरुद्ध हत्या, सामूहिक बलात्कार, खुनाचा प्रयत्न, अपहरण, अनैसिर्गिक अत्याचार आणि दरोडाच्या कलमांखाली दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
७ जानेवारी : न्यायालयाने बंद कमर्‍याआड सुनावणीचा आदेश दिला़
१७ जानेवारी : न्यायालयात पाच जणांविरुद्ध सुनावणी सुरु
२८ जानेवारी : बाल न्याय बोर्डाने आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितले़
२ फेब्रुवारी : आरोपपत्र निश्चित करण्यात आले
११ मार्च : राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली़
११ जुलै : बाल न्याय बोर्डाने अल्पवयीन आरोपीला सामूहिक बलात्कार घटनेच्या एक दिवस अगोदर १६ डिसेंबरला एका दुकानात शिरुन लुटालुट प्रकरणातही दोषी ठरविले़ दिल्ली उच्च न्यायालयाने तीन आंतरराष्ट्रीय वृत्त वाहिन्यांना या खटल्याची सुनावणी कव्हर करण्यास परवानगी दिली़
२२ ऑगस्ट : चारही आरोपींविरुद्ध खटल्याची अंतिम सुनावणी सुरु
३१ ऑगस्ट : बाल न्याय बोर्डाने अल्पवयीन आरोपीला सामूहिक बलात्कार आणि हत्याच्या खटल्यात दोषी ठरवून त्याला सुधार गृहात तीन वर्षांची शिक्षा सुनावली़
१० सप्टेंबर न्यायालयाने मुकेश, विनय, अक्षय आणि पवन यांना सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार, मुलीची हत्या आणि तिच्या मित्राच्या खुनाचा प्रयत्नासह १३ कलमाखाली दोषी ठरविले़
१३ सप्टेंबर चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्या आली़
३ जानेवारी २०१४ : उच्च न्यायालयाने आरोपीच्या याचिकेवरचा निकाल सुरक्षित ठेवला़
१३ मार्च : उच्च न्यायालयाने चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली़
१५ मार्च : दोन आरोपी मुकेश आणि पवन यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली़ त्यानंतर चौघांच्या शिक्षेला स्थगिती दिली़
३फेब्रुवारी २०१७ : उच्च न्यायालयाने आरोपीच्या फाशीच्या शिक्षेवर पुन्हा सुनावणी करण्याचा निर्णय घेतला़
५ मे : उच्च न्यायालयाने चारही फाशीची शिक्षा कायम केली़
९ जुलै २०१८ : उच्च न्यायालयाने तीनही आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली़
१८ डिसेंबर २०१९ : उच्च न्यायालयाने अक्षयच्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावली़ दिल्ली सरकारने डेथ वारंट जारी करण्याची मागणी केली़ दिल्ली न्यायालयाने तिहार प्रशासनाला दोषीना शिल्लक कानुनी विकल्पचा वापर करण्याची नोटीस जारी केली़
१९ डिसेंबर २०१९ : दिल्ली उच्च न्यायालयाने पवन कुमार गुप्ता याने घटनेच्या वेळी आपण अल्पवयीन असल्याचा अर्ज फेटाळून लावला़
६ जानेवारी २०२० : दिल्ली न्यायालयाने पवनचे वडिलांनी घटनेतील एकमेव साक्षीदार याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याची मागणी फेटाळून लावली़
७ जानेवारी २०२० : दिल्ली न्यायालयाने चारही दोषींना २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्याचा आदेश जारी केला़
१४ जानेवारी : उच्च न्यायालयाने दोन दोषी विनय शर्मा आणि मुकेश कुमार यांची सुधारात्मक याचिका फेटाळली़ मुकेश कुमार याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली़
१७ जानेवारी : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मुकेशची दया याचिका फेटाळली़
२५ जानेवारी दया याचिका फेटाळल्यानंतर मुकेश याने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.
२८ जानेवारी : उच्च न्यायालयात सुनावणी झाली निकाल राखून ठेवला़
२९ जानेवारी : दोषी अक्षयकुमारने सुधारात्मक याचिका दाखल केली़ राष्ट्रपती यांनी दया याचिका फेटाळण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात अपील केले होते़ ते न्यायालयाने फेटाळून लावले.