निर्भया केस : ‘आमच्या ‘या’ 2 वस्तू संभाळून ठेवा’, फाशीपुर्वी मुकेश अन् विनयनं जेल अधिकार्‍यांना सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार दोषींना शुक्रवारी पहाटे ५:३० वाजता दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर निर्भयाच्या कुटूंबाला न्याय मिळाला. फाशी देण्यापूर्वी तुरूंगातील नियमावलीनुसार गुन्हेगारांच्या इच्छा पूर्ण केल्या जातात. त्यांना फाशी देण्यापूर्वी दोषींना विचारले जाते की त्यांच्या मरणानंतर त्यांच्या मालमत्तेचे काय करावे. या व्यतिरिक्त अवयवदान करण्याबाबत देखील विचारले जाते. तसेच तुरूंगात असलेले त्यांचे सामान कोणाला द्यायचे, याबाबत देखील त्यांना विचारले जाते. या नियमावलीअंतर्गत चारही दोषींना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली. ही सर्व प्रक्रिया शुक्रवारी पहाटे ४:४५ ते ५ वाजेच्या दरम्यान झाली.

जेल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या सर्वांनी शेवटची इच्छा सांगितली नाही. तथापि, दोन्ही दोषींनी त्यांच्या काही वस्तूंना सांभाळून ठेवण्यास सांगितले. दोषी मुकेशने तुरूंगातील अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात सांगितले की, तो आपले शरीर दान करू इच्छित आहे, म्हणजेच त्याच्या शरीराचे अवयव दान केले जातील. तसेच फाशी देण्यापूर्वी विनयने तुरूंगातील अधीक्षकांना त्याने बनवलेली चित्रे दिली. याशिवाय त्याच्याकडे हनुमान चालीसा देखील होती. या दोन्ही गोष्टी त्याने कुटुंबाला देण्यास सांगितल्या. विनयने एकूण ११ चित्रे बनवली होती. अलीकडेच विनयच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले होते की त्याची चित्रे तिहार हाटमध्ये विकले देखील गेले आहेत.

कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार पवन आणि अक्षय काहीच बोलले नाहीत. तिहार जेल प्रशासनाचे म्हणणे आहे की जेलमधील दोषींनी कमावलेली रक्कम त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिली जाईल. याशिवाय त्यांचे कपडे व इतर वस्तूही त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात येतील.