निर्भया केस : दोषीच्या आई-वडिलांनी दरवाजा देखील नाही उघडला, अक्षयच्या गावातल्या लोकांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीपासून ९०० किमी लांब असणाऱ्या बिहारच्या औरंगाबादपासून जवळपास ३५ किमी अंतरावर अक्षयचे गाव कर्मालहंग आहे. सध्या त्याच्या गावात सगळीकडे शांतता पसरली आहे. तेथे लोक एकत्र येऊन अक्षयबाबत चर्चा करताना दिसत आहेत. सध्या सर्व लोक, माध्यमे गावात येऊन अक्षयच्या घराची विचारपूस करत असतात. गावातील लोक देखील आता माध्यमांना वैतागले आहेत. लोक वारंवार येऊन उलटसुलट विचारपूस करत असतात. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की निर्भया प्रकरण घडल्यापासून संपूर्ण गाव अडचणीत आले आहे.

अक्षयने केलेल्या कृत्याबद्दल गावकऱ्यांमध्ये नाराजी
गावातील सर्वांच्या तोंडी अक्षयचे नाव असून गावातील लोकांना अक्षयला फाशी दिल्याबाबत खेद जरूर आहे, पण दुःख अजिबात नाही. त्याने केलेल्या कृत्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सध्या कर्मालहंग गावात मिडिया मोठ्या प्रमाणात येत आहे. जेव्हा गावातील लोकांना विचारपूस केली तर कुठलीही प्रतिक्रिया न देता लोक घरात जातात. गावात अक्षयचे घर असून तेथे सध्या अक्षयचे आई-वडील आणि भाऊ वास्तव्य करतात.

अक्षयने जसे कृत्य केले त्याला त्याप्रमाणे शिक्षा मिळाली
ग्रामप्रमुख मालतीदेवी यांच्याशी संवाद झाला. तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘अक्षयने जसे कृत्य केले त्याला त्याप्रमाणे शिक्षा मिळाली आहे. गावातील मुलाला फाशी देण्यात आली त्यामुळे सर्वांना त्याचा त्रास होत आहे. अक्षयमुळे त्याच्या कुटुंबियांनाही त्रास सहन करावा लागत आहे. अक्षयची पत्नी पुनीता देवी आपल्या मुलाला घेऊन दिल्लीला गेली आहे. अक्षयचा मोठा भाऊ विनय देखील पुनितासमवेत दिल्लीला आहे. कुटुंबात सध्या आई-वडील आणि एक भाऊ आहे.’

अक्षयच्या एका चुकीमुळे पूर्ण गाव बदनाम झाले आहे
गावातील लोकांना अक्षयबद्दल विचारले तर अक्षयचा या गावाशी काहीही संबंध नाही असे लोक सांगतात. गावकरी म्हणाले की, ‘त्याने आमच्या गावाचा मान-सन्मान मातीत मिसळला आहे. ७-८ वर्षांपूर्वी आमच्या गावाकडे लोक आदरपूर्वक बघत होते. या गावातील बरेच तरुण आज आपापल्या जागी पुढे गेले आहेत. निर्भया प्रकरण पुढे आल्यापासून येथे येणारा प्रत्येकजण अक्षयला विचारतो. एका मुलाने चूक केली आणि संपूर्ण गाव बदनाम होत आहे. आमचे नातेवाईकही घरी येण्यास संकोच करतात’ असे त्यांनी स्पष्ट केले.