‘किम जोंग उन’ यांच्या आरोग्याबद्दल पसरतायेत ‘अफवा’, पण सत्य काय ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर कोरियाचा 36 वर्षीय शासक किम जोंग उन बद्दल सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. इतकेच नाही तर काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी किम यांच्या प्रकृतीशी संबंधित बातम्याही प्रकाशित केल्या आहेत. या अहवालांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. परंतु अधिकृतपणे, किम यांच्याबद्दल असलेली माहिती जाणून घेऊया…

किमविषयी एका जपानी मीडियाने आणि एक चिनी समर्थित पत्रकाराने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. 11 एप्रिलपासून किम देशातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. यानंतर त्यांच्या तब्येतीबद्दल अनेक प्रकारचे कयास लावले जात आहेत. किम जोंग उन 15 एप्रिल रोजी आपल्या आजोबांच्या बर्थ अ‍ॅनिव्हर्सरीच्या आयोजित कार्यक्रमात देखील सहभागी झाले नाहीत. उत्तर कोरियाचे जनक किम इल संग यांची बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि देशात सुट्टी देखील जाहीर केली जाते.

उत्तर कोरियाच्या सरकारने किमबाबत कोणतेही विधान केलेले नाही. पण दक्षिण कोरियाच्या सरकारने किमच्या तब्येतीबद्दलच्या वृत्तास फेटाळून लावले. किम जोंग उन यांच्याशी संबंधित बातमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या आठवड्यात सांगितले की अमेरिकेला याबाबत विश्वसनीय माहिती नाही. यापूर्वी अमेरिकन मीडियामध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी उद्धृत केले होते की किमशी संबंधित बातम्यांवर अमेरिका नजर ठेऊन आहे.

एका अमेरिकन वृत्तवाहिनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अमेरिका ‘शस्त्रक्रियेनंतर किमच्या गंभीर अवस्थे’ संबंधित वृत्तांवर नजर ठेवून आहे. या वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

त्याचबरोबर एका वृत्तसंस्थेने शुक्रवारी आपल्या अहवालात म्हटले आहे की, चीनने वैद्यकीय तज्ञांची एक टीम उत्तर कोरियाला पाठविली आहे. ही टीम उत्तर कोरियामधील किमच्या प्रकृतीविषयी सल्ला देईल. तथापि, या अहवालात असेही म्हटले आहे की चीनकडून वैद्यकीय तज्ज्ञ पाठवण्याविषयी माहिती असूनही किमची तब्येत कशी आहे हे सांगता आले नाही. उत्तर कोरियामध्ये प्रेस स्वातंत्र्य नाही आणि येथे सरकारशी संबंधित माहिती अत्यंत गुप्त ठेवली जाते. त्याचबरोबर उत्तर कोरियाचे सरकारी माध्यमे या संपूर्ण प्रकरणावर सध्यातरी गप्प आहेत.