‘…की आमच्यासोबत येऊन मुख्यमंत्रीपद घेणार’ : छगन भुजबळांची खुली ऑफर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी युतीत आताच रस्सीखेच सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेत समान वाटणीचं वक्तव्य केलं आहे. यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमचं जे ठरलं आहे त्यानुसारचं आम्ही पुढे जाणार आहोत असं म्हटलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद घेणार की आमच्यासोबत येऊन मुख्यमंत्रीपद घेणार असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. येवल्यातून ते निवडून आले आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

दरम्यान उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते म्हणाले होते, “लोकसभा निवडणुकीवेळी सत्तेत समसमान वाटा(50-50) देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. त्याची अंमलबजावणी करायला हवी. त्यानंतरच सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात येईल” असा इशारा त्यांनी दिला. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, “जागावाटपात समजून घेतलं. सत्ता वाटपात समजून घेणार नाही. मला सत्तेची हाव नाही. त्यामुळे मी सत्तेसाठी वेडेवाकडे पर्याय स्विकारणार नाही.” असेही त्यांनी म्हटले होते.

पुढे ते म्हणाले, “भाजपने जागावाटपावेळी अडचण असल्याचं सांगितलं होतं. मात्र प्रत्येक वेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही. गरज पडली तर अमित शहा चर्चेला येतील” असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना म्हटलं होतं की, “कोणी काहीही म्हटलं तरी पुन्हा महायुतीचच सरकार येणार. उद्धव ठाकरे काय म्हणाले ते मी ऐकलं आहे. आमचं ठरलं आहे त्यानुसारचं आम्ही पुढे जाणार आहोत. नेमकं काय ठरलं आहे ते योग्य आल्यानंतर कळेलच. भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले पक्ष आहेत. सगळं काही ठिक होईल. कुणी चिंता करण्याचे कारण नाही.” असे ते म्हणाले होते.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like