आंदोलकांना ठार मारायला हा उत्तरप्रदेश नाही, ममता बॅनर्जी भाजपावर भडकल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशभरात केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्यावरून वातावरण चिघळलेले आहे. या कायद्याविरुद्ध देशातील जनतेने आंदोलने पुकारली असून त्यांना हिंसक वळण लागले आहे. इतर राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणात आंदोलने होत आहेत. आणि यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी गोळ्या घालून ठार मारू, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते, यावर ममता बॅनर्जींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

घोष यांनी ममता बॅनर्जी यांना एका सभेमध्ये प्रश्न केला आणि म्हटले होते की, पोलीस आंदोलकांवर कारवाई करत नाही कारण हे आंदोलक तुमचे मतदार आहेत. परंतु ते बाहेरून आलेले आहेत आणि ते मालमत्तेचे नुकसान देखील करत आहेत. आमचे उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकचे सरकार अशा लोकांना कुत्र्यासारख्या गोळ्या घालून ठार करत आहे. तुम्ही इथे आला आहात. आमचा घास खात आहात. इथेच राहून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करता. ही काय तुमची जमीनदारी आहे का ? तुम्हाला लाठ्यांनी मारून, गोळ्या झाडून आणि तुरुंगात टाकावे लागेल. अशा भाषेत घोष यांनी सुनावले.

घोष यांवर ममता बॅनर्जी यांनी पलटवार करत त्यांना सुनावले की, घोष यांचे नाव घ्यायला देखील मला लाज वाटते कारण त्यांचे वक्तव्य हे अत्यंत घृणास्पद आहे. तसेच ममता बॅनर्जी म्हणाल्या की तुम्ही गोळीबाराला प्रोत्साहन देत आहात, हा उत्तरप्रदेश नाही. उद्या जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला तुम्ही देखील जबाबदार असणार आहात, हे आधी लक्षात घ्या. आंदोलकांना ठार मारायच्या गोष्टी करता ? अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी घोष यांचा तीव्र संताप व्यक्त केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/