‘आता शांत बसणार नाही’ : युजवेंद्र चहल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात दहशतवाद आणि पाकिस्तान यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. भारताच्या क्रिकेटपटूंनाही राग आता अनावर झाला असून त्यांनी थेट युद्धाची भाषा केली आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल, ‘आता शांत बसणार नाही’ असे म्हणत पाकिस्तानवर चांगलाच बरसला आहे.

चहल म्हणाला की, “आता भारत हे सर्व सहन करणार नाही, ते एकदाच संपायला हवे. भारतीय सीमेवर वारंवार दहशतवादी हल्ले होतात आणि त्यामध्ये आपले जवान मारले जातात. पण यापुढे असे होऊ नये, असे मला वाटते. कारण आपण बराच काळ चर्चा केली पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून या गोष्टी सुधारतील, असे मला वाटत नाही. हा विषय आता कायमचा मिटवण्याची वेळ आली आहे.”

चहल पुढे म्हणाला की, ” दर तीन महिन्यांनी भारतामध्ये दहशतवादी हल्ले होत असतात. हे हल्ले कायमचे थांबायला हवेत. आता आम्ही आपले जवान शहीद होण्याची वाट पाहत बसणार नाही. त्यामुळे या प्रकरणाचा कायमचा छडा लावायला हवा.”