‘या’ कारणामुळे नर्सेस संघटना करणार 1 सप्टेंबरपासून आंदोलन

जुन्नर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात राज्यभरात आरोग्य विभागातील नर्सेस योध्याप्रमाणे कर्तव्य बजावत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या नर्सेस अनेक प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून पुणे जिल्हा परिषदेच्या परिचारिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशी माहिती जुन्नर तालुका अध्यक्षा अनिता कासार व कार्याध्यक्ष सुनिता गाडेकर यांनी दिली.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरु असलेल्या परिचारिका आंदोलनामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या परिचारिकाही सहभागी होणार आहेत. आमच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना पुणे यांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा लेखी स्वरुपात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

जुन्नरचे तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांना जुन्नर तालुका संघटनेच्या वतीने निवेदन दिले आहे. ग्रामीण भागात सुमारे 18 हजार नर्सेस काम करत असून त्या आपल्या मागण्यांसाठी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत नर्सेस काळी फित लावून काम करणार आहेत. शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर 8 सप्टेंबर रोजी काम बंद संप करणार असून तरीही मागण्या मंजूर झाल्या नाही. तर 9 सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.