पोलिसांवर जमावाकडुन जीवघेणा हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – यात्रेतील सोरट जुगारावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या अंबड पोलिसांवर जमावाने दगड फेक करू जीवघेणा ह्ल्ला केला. या हल्ल्यामध्ये पोलीस उप निरीक्षक सुग्रीव चाटे जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ३० ते ३२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी येथे घडली.

पोलीस ठाणे अंबड येथील नेमणुकीस असलेले पोलीस उप निरीक्षक शैलेश शेजुळ, सुग्रीव चाटे, पोलीस उप निरीक्षक पि.डी.पाटील, पोलीस कॉन्सटेबल संदिप कुटे, आर.आर.सोनवणे असे दोन पंचासह खाजगी वाहनाने नांदी येथील यात्रेत सोरट नावाचा खेळावर धाड टाकण्यासाठी  गेले होते. त्यांनी सोरट खेळणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले व त्यांना वाहनात बसविले. त्यावेळी तेथे शबाना सय्यद कय्युम, शबीनाबी बाबुलाल सय्यद व इतर एक असे वाहनासमोर आडवे झाले. तेव्हा तेथे मोठा जमाव जमा झाला. त्यांनी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन आरोपींना पळून लावून आरडा-ओरड केली. पोलीस उप निरीक्षक सुग्रीव चाटे यांना घेराव घालून त्यांच्याशी हुज्जत घालू लागले. त्यांनी चाटे यांना लाठ्या व काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात झाली. तेव्हा चाटे हे तेथून पळ काढताच त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये चाटे हे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना समजताच त्यांनी जालना येथील दंगल नियंत्रण पथकातील दोन वाहने, अंबड, घनसावंगी व गोंदी असे एकूण सात वाहने आणि ७० ते ८० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा नादी येथे दाखल झाला. त्यांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणुन आरोपींची धरपकड करून पाच जणांना ताब्यात घेतले.