उस्मानाबाद पोलिसांकडून दुचाकी चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक तर 44 दुचाकी जप्त

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद पोलिसांनी आज एका दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून तब्बल 44 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी 2 अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी आरोपींकडून 44 दुचाकी जप्त करीत 2 गुन्हेगारांना अटक देखील केली आहे. हे अट्टल गुन्हेगार पुणे आणि सोलापूर या मोठ्या शहरात दुचाकी चोरत होते. दुचाकी चोरल्यानंतर गाडीचे चेसी, इंजिन आणि नंबर बदलून गाडी विक्री करण्याचे काम हे आरोपी करत होते.

एवढंच नाहीतर या चोरांनी सामान्य नागरिकांसह पोलिसांनाही फसवलं असल्याची बाब समोर आली आहे. उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला या टोळीची खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि या चोरांवर पाळत ठेवली. अखेर या टोळीला रंगेहाथ पकडलं.

त्यानंतर तीन दिवसांच्या तपासातून या टोळीकडून 44 गाड्या देखील ताब्यात घेतल्या आहेत. या 44 गाड्याची किंमत 14 लाख 56 हजार रुपये एवढी आहे. शंकर देवकुळे आणि विठ्ठल मगर असं या आरोपींची नाव आहे. या दोघांसोबत आणखी कोण कोण आहे याचा पोलीस तपास करत आहे.

तसंच, चोरण्यात आलेल्या या दुचाकी कुणाच्या चोरल्या किंवा आणखी काही धागेदोरे हाती लागतात का याचा तपास करत असल्याची माहिती उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन यांनी दिली आहे.