31 मार्चपर्यंत जर नाही केले PAN कार्ड Aadhaar ला लिंक तर लागणार 10000 रूपयाचा दंड, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केलेले नसेल तर ते तात्काळ करुन घ्या, अन्यथा तुम्हाला भरघोस दंड भरावा लागेल. माहितीनुसार जर तुम्ही 31 मार्चपूर्वी पॅन आधार कार्डला लिंक केले नाही तर आयकर विभाग तुमच्याकडून 10,000 रुपयांचा दंड आकारु शकते. हा दंड निष्क्रिय पॅन कार्ड वापरल्याचा आरोपाखाली आकारण्यात येईल.

आयटी डिपार्टमेंटने यापूर्वी सांगितले होते की, पॅन आधार लिंक करण्याची अखेरची तारीख (डेडलाइन) उलटून गेल्यानंतर ते लिंक होणार नाही, त्यानंतर पॅनधारकांचे पॅन निष्क्रिय घोषित केले जाईल. आता विभागाकडून सांगण्यात आले की कार्ड लिंक न केलेल्या लोकांकडून आयकर कायद्यांतर्गत सक्रिय पॅन कार्ड न बाळगल्याप्रकरणी आरोप लावून दंड आकारला जाईल.

काय आहे कायदा –
नियमानुसार पॅन निष्क्रिय झाले तर असे मानले जाईल की तुम्हाला कायद्यांंतर्गत पॅन देण्यात आलेले नाही. याअंतर्गत तुम्हाला आयकर कायदा कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल. कायद्यातील कलम 139 ए नुसार पॅन कार्डची मागणी केल्यावर ते दाखवणे अनिवार्य आहे.

परंतु तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की, तुम्ही पॅन कार्ड बँक खाते सुरु करण्यासाठी किंवा वाहन परवान्याचा अर्ज करण्यासाठी वापरले तर तुमच्याकडून दंड आकारला जाणार नाही परंतु, तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय असल्याने बँकेत काही मोठे ट्रांजेक्शन झाले आणि त्यावर आयकर खात्याची नजर पडली तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. जर तुम्ही बँक खात्यातून 50,000 पेक्षा जास्त रुपये काढले किंवा जमा केले तर तुम्हाला पॅन कार्ड दाखवणे अनिवार्य आहे.

दिलासा –
तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय ठरले तर नवे पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचे जुने पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करु शकतात, लिकिंगनंतर तुमचे पॅन कार्ड वैध होईल.