पंकजा मुंडेंनी आता ‘या’ निवडणुकीकडे वळवला मोर्चा !

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – परळी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे राजकारणापासून काही दूर गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गोपीनाथ गडावर कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राजकारणात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता त्या नव्या जोमाने कामाला लागल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पकंजा मुंडे यांनी कंबर कसली आहे.
पंकजा मुंडे यांनी आज (मंगळवार) जिल्हा परिषदेच्या सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीला 29 सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषद निवडणुकीत काय रणनिती आखायची याबद्दल या बैठकित चर्चा झाल्याचे सुत्रांकडून समजतेय. राज्यात समीकरण वेगळं असलं तरी बीडमध्ये बदल होणार नाही. जिल्हा परिषद माझ्याच ताब्यात राहणार, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवला.

भाजप, शिवसेना, काँग्रेस, शिवसंग्राम यांच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषदेत अडीच वर्षे भाजपची सत्ता होती. मात्र, आता राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आज पंकजा मुंडे यांनी सर्वांना एकत्रित करून बैठक घेतली. विशेष म्हणजे, या बैठकीपूर्वी महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गडकर यांच्यासोबत पंकजा मुंडे यांनी बंद दाराआड चर्चा केली. विठ्ठल महाराज हे गहिनीनाथ गडाचे महंत आहेत.
जिल्हा परिषदेतील संख्याबळ भाजप – 18, शिवसेना -4, शिवसंग्राम मधून भाजपत आलेले -4, काँग्रेस -2 तर राष्ट्रवादी गटातील नमिता मुंदडांसोबत भाजपमध्ये आलेला 1 सदस्य असे 29 सदस्य आहेत. सत्ता स्थापनेसाठी 27 सदस्यांची गरज आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/