पारनेरचे 5 नगरसेवक पुन्हा शिवबंधनात, मातोश्रीवर घेतली CM उद्धव ठाकरेंची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- पारनेरच्या माजी आमदारांमुळे नाराज झालेल्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मोठा वादाचा प्रसंग उभा केला होता. यावरून मागील तीन-चार दिवसांपासून शिवसेना-राष्ट्रावादीमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेर शरद पवार यांचे मातोश्रीवर जाणे, दुसऱ्याच दिवशी ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याशी चर्चा करणे आदी घडामोडींनंतर महाविकास आघाडीतील पेच सुटला आहे. अखेर ते पाच नगरसेवक पुन्हा शिवबंधनात आले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी 4 जुलै रोजी बारामती येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. महाविकास आघाडीतील समन्वयावरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजीत पवार यांना फोन केला. त्यांनी याबाबत अजीत पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. आमचे नगरसेवक परत पाठवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मंगळवारी सायंकाळी अजित पवार आणि ठाकरे यांची मुंबईत सुमारे दीड तास बैठक झाली.

यानंतर बुधवारी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना अजीत पवारांनी मंत्रालयात बोलावून घेतलं. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत ते पाचही नगरसेवक हजर झाले. पवारांनी या पाचही नगरसेवकांना नार्वेकर यांच्याकडे सोपवले. त्यानंतर या नगरसेवकांना मातोश्रीवर नेण्यात आले. यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.