‘या’ कारणामुळं आ. गणपतराव देशमुखांच्या पायावर डोकं ठेऊन कार्यकर्ते रडले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुढील महिन्यात ही निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. तसेच अनेक विधानसभा मतदारसंघात वातावरण तापलेले दिसून येत आहे. अनेक आमदार आणि नेते या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारताना दिसून येत आहेत. मात्र एकीकडे दलबदलू आमदार असताना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या गणपतराव देशमुख यांनी या आमदारांपुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.

सलग 11 वेळा या मतदारसंघातून गणपतराव देशमुख हे शेकापचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र त्यांनी कधीही पक्षबदल करण्याचा विचार केला नाही. मात्र त्यांच्या याच भूमिकेमुळे जनतेने आणि मतदार राजाने त्यांना 11 वेळा विधानसभेत पाठवले. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्यावरील जनतेचे प्रेम दिसून आले आहे. सांगोल्यातील एका कार्यक्रमात एक घटना पाहायला मिळाली. गणपतराव देशमुख यांनी यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे घोषित केले आहे. मात्र सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी देशमुख यांना पुन्हा निवडणूक लढवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी अक्षरशः त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांना विंनती केली. तसेच काहींना तर अश्रू देखील अनावर झाले. मात्र त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसून मी हयात असेपर्यंत आपल्याला येथून शेकापचाच आमदार निवडून आणायचा असल्याचे देखील सांगितले.

दरम्यान, माझ्याकडे उमेदवारीसाठी पाच नावे आली असून लवकरच यासंदर्भातील निर्णय घेणार असल्याचे देखील यावेळी सभेत त्यांनी सांगितले. तसेच मी उमेदवार नसलो तरीही आपण शेकापचाच आमदार निवडून आणायचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच मी निवडणूक लढणार नसलो तरी आपण राजकारण आणि समाजकारण सोडणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.