राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना वाटते तिहारमधील ‘या’ कैद्यांची भीती : आंबेडकर

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तिहार जेलमध्ये बसलेल्या कैद्यांची भीती वाटत आहे. त्याने जर तोंड उघडले की सर्वांचे खरे चेहरे समोर येतील असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील गोंदिया येथील प्रचारसभेत केले होते. त्याचा संदर्भ देत पवार यांना तिहार जेलमधील कुख्यात गुंड छोटा राजन आणि ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्चन मिशेल हे तोंड उघडतील याची भीती वाटत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंतप्रधानांच्या आरोपानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथील प्रचारसभेत, आमची कळ काढाल तर माफी नाही, असे आव्हान मोदी यांना दिले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आव्हान स्वीकारणार का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. तसेच निवडणूकीत सर्वच गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजेत, त्यामुळे मोदींनी पवारांचे आव्हान स्विकारण्याची गरज असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

सध्या तिहार तुरुंगात कुख्यात गुंड छोटा राजन आणि ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी कैदेत आहेत. भारताचा फरार डॉन दाऊद इब्राहिमने शरणागतीचा प्रस्ताव भारत सरकारला दिला होता. त्यावेळी युपीएचे सरकार होते. परंतु, हा प्रस्ताव शरद पवार यांनी फेटाळला होता. ही गोष्ट दाऊदचा एकेकाळचा साथीदार असलेल्या छोटा राजनच्या तोंडून बाहेर पडली तर काय होईल याची भीती राष्ट्रवादीला वाटत आहे. तसेच त्यांनी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपी ख्रिश्चन मिशेलचाही धसका घेतल्याचे आंबेडकर म्हणाले.