अजित पवारांनंतर समर्थकही ‘अ‍ॅक्टिव्ह’, पिंपरी चिंचवडमधून पहिला राजीनामा

पिंपरी चिंचवड  ( पुणे ) : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं समर्थन करण्यासाठी पक्षातील इतर नेते राजीनामा देण्यासाठी पुढे येत आहेत. अजित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांचे समर्थक व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

शेख यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या सूडाच्या राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत,’ असं कारण जावेद शेख यांनी दिलं आहे.

अजित पवार यांचा राजीनामा –

अजित पवार यांनी आमदराकीचा राजीनामा दिला असून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पवारांचा राजीनामा मंजूर केला. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात झाली असतानाच पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यात आपल्याविरुद्धही गुन्हा दाखल झाल्याने अस्वस्थ होऊन त्यांनी राजीनामा सादर केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून समजल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे तर पक्षाअंतर्गत नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा आहे. मात्र अजित पवारांच्या राजीनाम्याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.