‘कोव्हिड’ रुग्णालयाच्या परिसरातच विषारी नागाचा प्रवेश, पाहा व्हिडिओ

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णालयाच्या परिसरात एका विषारी नागाने प्रवेश केल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची एकच तारांबळ उडाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पिंपरीतील यमुना नगर परिसरात असलेल्या रुग्णालयातील हा प्रकार आहे.

रुग्णालयाच्या परिसरात फिरणार्‍या एका नागरिकाच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी तात्काळ सर्पमित्राला पाचारण केले. सर्प मित्र राजू कदम याने काही वेळातच या नागाला जेरबंद केले. कोरोनाच्या पाठोपाठ रुग्णांवरील संकट दूर झाल्याची चर्चा करत सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. कोव्हिड रुग्णालय परिसरात पकडलेल्या या नागाला मानवी वस्तीपासून दूर असलेल्या वन क्षेत्रात सोडून देण्यात आले आहे. रुग्णालय परिसरात दाट गवत वाढलेले असल्याने तिथे या सापाचे वास्तव्य असावे अशी शक्यता सर्पमित्र राजू कदम यांनी वर्तवली आहे. दरम्यान, पावसाला सुरुवात झाल्यावर गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्तीत नाग आढळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.