Pimpri : ‘ड्राय डे’च्या दिवशी मद्याचा पूर ! हॉटेल, ढाब्यासह सर्वत्र मिळत होती मुबलक दारू, 11 लाखांचा माल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान असल्याने शासनाने पुण्यासह पाच जिल्ह्यांत दारूबंदी जाहीर केली होती. १ डिसेंबर रोजी ड्राय डे असताना शहरासह अनेक ठिकाणी मद्याचा पूर कायम होता. हॉटेलसह वेगवेगळ्या ठिकाणी सर्वत्र दारू सहजपणे मिळत होती. पिंपरी पोलिसांनी ८ ठिकाणी कारवाई करून १० लाख ९२ हजार रुपयांची देशी-विदेशी तसेच हातभट्टीची दारू पकडली आहे.

देहूरोड हॉटेल एम एस तुळसाई या हॉटेलमध्ये व इनोव्हा कारमध्ये १० लाख ३६ हजार ८८८ रुपयांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या व बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. या गुन्ह्यात पोलिसांनी हॉटेलमालक सुनील धनराज पाटील (वय २५, रा. आंबेठाण) आणि हॉटेल मॅनेजर भगवान सुरेश पाटील (वय ३०, रा. विठ्ठलवाडी, ता. हवेली) यांना अटक केली आहे.

माया राकेश भाट (वय ३३, रा. चिंचवड) या इंदिरानगर येथे देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांची विक्री करताना आढळून आल्या. त्यांच्याकडून दीड हजार रुपयांची दारू जप्त केली आहे.

सांगवी येथील गणेशनगर येथे अतुल वसंत टेकाळे (वय ३५, रा. नवी सांगवी) हा दुचाकीवरून विदेशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून २७ हजार ६७० रुपयांची दारू जप्त केली आहे.

भोसरी येथील बालाजीनगरमधील धर्मा किराणा दुकानाशेजारील बोळामध्ये पप्पू धर्मा वाघमारे हा हातभट्टीची दारू विकत असताना दिसून आला. त्याच्या ताब्यातून १ हजार ७०० रुपयांची दारू जप्त केली आहे.

दिघीमधील चर्‍होली फाटा येथील सररंग हॉटेलच्या बाजूला मोकळ्या जागेत दीपकसिंग राजनसिंग मेहरा (वय ३०) याच्याकडे ३ हजार ३२६ रुपयांच्या देशी दारू व बिअरच्या बाटल्या आढळून आल्या.

दिघी येथील भारतमातानगर येथील बनाच्या ओढ्याजवळ प्रदीप जगधने (वय ४५, रा. बोपखेल) याच्याकडे ४ हजार ४३४ रुपयांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. देहूरोड येथील विकासनगरमध्ये दोघांजवळ १० हजार १८० रुपयांच्या ६२ बिअरच्या व दारूच्या बाटल्या आढळून आल्या. कृष्ण विठ्ठल पुजारी (वय ३३), कैलाससिंग भगवतसिंग पटवाल (वय २५, रा. विकासनगर, देहुरोड) यांना अटक करण्यात आली आहे.

देहूरोड येथील हॉटेल मूनलाईट येथे २ हजार ४० रुपयांच्या १२ बिअरच्या बाटल्या विकताना आढळून आले. विष्णू रामपोलो दास (वय २४, रा. मनुलाईट हॉटेल, रावेत), हरी रामपोलो दास (वय १९) या दोघांना अटक करण्यात आली. महेश ऊर्फ सिद्धार्थ नागनाथ माडेकर याच्या सांगण्यावरून दारू विक्री करीत असल्याचे त्यांनी सांगितले.